Hurry Up Now The Deal is Here!

लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित नवल वाटेल. पण ती वस्तुस्थिती आहे. हा माणूस आहे खरा आहे उद्योजक .पण प्राध्यापकाच्या ठिकाणी अपेक्षित सर्व गुण त्याच्या ठिकाणी आहेत आणि आणि म्हणूनच अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये या माणसाचे चांगले नाव आहे. खऱ्या अर्थाने भगवान महावीराचा संदेश केवळ अमरावतीतच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पोहोचण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे.
सुदर्शन जैन हे नाव आता अमरावतीकरांना अपरिचित राहिलेले नाही. तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर त्यांची भव्य दिव्य अभ्यासिका व ग्रंथालय पाहून तुम्ही चकित व्हाल. स्वतंत्र मजल्यावर मोठ्या सभागृहामध्ये त्यांचे ग्रंथालय व अभ्यासिका आहे. मुद्दाम त्यांनी ती घराच्या वरच्या मजल्यावर घेतलेली आहे .म्हणजे अभ्यास करताना लिहिताना वाचताना इतर लोकांचा व्यत्यय त्यामध्ये यायला नको. त्यासाठी त्यांनी घराचा एक पूर्ण मजला वापरला आहे.
त्यांच्या ग्रंथालयामध्ये सर्व प्रकारचे ग्रंथ आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते सगळे ग्रंथ त्यांनी वाचलेले आहेत. नुसतेच वाचले नाहीत. तर ठीक ठिकाणी अंडरलाईन करून ठेवलेले आहेत. त्यापैकी अनेक ग्रंथावर त्यांनी स्वतः नोट्स काढलेल्या आहेत आणि त्या देखील सुरक्षित आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या ग्रंथाची साधारण पाच एक हजार तरी संख्या असेल. ग्रंथ नीटनेटके कपाटामध्ये लावलेले आहेत. बसण्याची वाचण्याची अतिशय सुयोग्य व्यवस्था त्यांनी केलेली आहे. कुठेही व्याख्यानाला जाताना ते स्वतः नोट्स काढून जातात आणि आपल्या भाषणामध्ये आपण अभ्यास केलेल्या ग्रंथाचा त्यातील घटनांचा उल्लेख करतात .त्यामुळे त्यांचे भाषण हे सुश्राव्य होते हे वेगळे सांगणे न लागे.
अनेक घरात ग्रंथ हे शोभेची वस्तू म्हणून ठेवलेले असतात. तुमच्याही घरी ग्रंथ आहेत पण ते कितपत वाचल्या गेलेले असतात नव्हे कितपत हाताळलेले गेलेले असतात याचे सर्वेक्षण केले तर ते अत्यल्प ठरेल. अनेक महाविद्यालयात मी जातो. इथल्या ग्रंथालयात जातो. पुस्तके हाताळतो. तेव्हा माझ्या लक्षात येते की या पुस्तकाच्या वाट्याला अजून एकही वाचक आलेला नाही. पुस्तके कोरीच्या कोरीच असतात .
आपल्या उद्योगातून सामाजिक कार्यातून धार्मिक कार्यातून वेळ काढून या माणसाने अध्ययन केले आहे.रितसर नोट्स काढलेले आहेत. नुसतं नोट्स काढून ते थांबले नाहीत तर त्या त्यांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवल्या आहेत. तुम्ही कोणताही ग्रंथ काढला आणि सुदर्शन सरांना त्या ग्रंथाबद्दल माहिती विचारली तर ते साधारणपणे अर्धा तास त्या ग्रंथावर बोलू शकतात इतका त्यांच्या व्यासंग आहे.
भगवान महावीरांचा संदेश पोहोचण्यासाठी ते संपूर्ण भारतभर फिरलेले आहेत. ज्या काळात वाहन उपलब्ध नव्हते त्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसचा त्यांनी उपयोग केलेला आहे. आणि सकाळपासून सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन वेगळ्या संस्थांमध्ये जाऊन भगवान महावीरांच्या चांगल्या कामाची माहिती पोहोचण्यासाठी तसेच परोपकाराचा संदेश व खऱ्या आयुष्याच्या संदेश पोहोचण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केलेले आहे.

श्री सुदर्शन जैन हे जेवढे व्यस्त आहेत तेवढेच सतर्क पण आहेत. परवा मी पुण्यावरून निघालो. वाघोलीला चालकाने गाडी थोडी हळू केली आणि माझ्या लक्षात आले की रस्त्याच्या उजव्या बाजूला जैन धर्मियांची मोठी शाळा मला दिसली. मी चालकाला म्हटले गाडी या शाळेमध्ये घे. गाडीत असणारे बाकीचे मित्र म्हणाले सर या शाळेत आपल्या कोणी ओळखीचे नाही. मी म्हटलं ओळखीचे कशाला पाहिजे. जैन धर्मियांची शाळा आहे . सर्वश्री शांतीलालजी मुथा सुदर्शन जैन आपले मित्र आहेत .आपण भेटून तर पाहूया .मी तिथे गेलो. माझा परिचय दिला आणि त्या शाळेमध्ये मी तीन व्याख्याने दिली आणि त्याचे फोटो फेसबुकवर टाकले. लगेच मला श्री सुदर्शन जैन यांचा फोन आला ते म्हणाले .सर तुम्ही माझ्या शाळेत पोहोचले. मला माहित पण नाही. मी त्यांना म्हटले सर इथे येणे भाषण तीन भाषणे देणयात एवढा वेळ गेला की तुम्हाला फोन करायलाही वेळ मिळाला नाही. पण मी भाषण पुण्याजवळ दिले आणि ते त्यांनी अमरावतीला लगेच पाहिले ही गोष्ट मला फार मोलाची वाटली .खरं म्हणजे माझ्या एखाद्या प्राध्यापक मित्राचा प्राध्यापक नातेवाईकाचा फोन यायला पाहिजे होता पण फोन आला तो सुदर्शन जैन यांचा कारण हा माणूस माणुसकीला जपणारा खऱ्या अर्थाने माणुसकीचा झरा आहे त्यांच्याकडे जर गेलात तुम्ही तुमचा परिचय असो वा नसो तुम्हाला याच्यावर आदरततिथ्याचा इतका भडीमार होतो आणि तोही अतिशय प्रेमाने हळुवारपणे नाजूकपणे नकळत तुमच्या समोर पदार्थ येत राहतात. एक संपला की दुसरा. दुसऱ्या संपला की तिसरा आणि सगळ्यात समारोपाला येते ते जैन धर्माच्या अनुसरून असलेले जेवण.त्यांचा लाघवी निगर्वी स्वभाव पाहता त्यांनी अतिशय विनयशीलतेने केलेले आदर पाहताच तुम्ही ते नाकारू शकत नाही. कारण सुदर्शन जैन यांनी आपल्या बोलण्यातून वागण्यातून आचरणातून जी नम्रता विनम्रता व्यक्त केली आहे ती तुम्हाला निश्चितच संमोहित करून सोडते. यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. इतकी विनयशीलता विनम्रता यायला खूप वर्ष खर्ची घालावी लागतात .एवढे करूनही ते येईलच याची शाश्वती नसते. पण सुदर्शनजींना ती कला अवगत झालेली आहे. खेड्यापाड्यात राहणारा हा माणूस आज अमरावतीच्या बडनेराजवळ जरी स्थिरावला असला तरी शेतकऱ्यांविषयी खेड्यांविषयी गरिबांविषयी त्याला असतानी प्रेम आहे आणि म्हणून यांच्याकडे आलेला कोणताही माणूस रिकाम्या हाताने परत जाऊ शकत नाही .आधुनिक दानशूर कर्ण अशी उपाधी त्यांना दिली तर ती अतिशय होणार नाही असे मला वाटते स्वतःची अभिनंदन बँक सांभाळून स्वतःचा उद्योग सांभाळून स्वतःचा परिवार सांभाळून हा माणूस समाजासाठी सामाजिक कार्यासाठी जो वेळ देतो तो महत्त्वाचा आहे. नाहीतर अनेक उद्योजक व्यापारी लोक पैसे देऊन देणगी देऊन मोकळे होतात. आम्हाला वेळ नाही देणगी घेऊन जा आणि कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असे म्हणतात. पण सुदर्शनजींच्या शब्दकोशामध्ये हा वाक्यप्रयोग नाही आहे .ते मदत तर करतातच. पण पूर्ण वेळ कार्यक्रमाला थांबतात .आलेल्यांचे स्वागत करतात. त्यांच्याशी समरस होतात आणि कार्यक्रम संपल्यानंतरच कार्यक्रमाच्या ठिकाणावरून प्रस्थान करतात.

परवा मला आठवते आमचे परिवारातील होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य राम गोपाल तापडिया यांचे दुःखद निधन झाले होते. मी मा. लेडी गव्हर्नर कमलताई गवई गोविंद कासट आम्हाला त्यांच्या परिवारात जायचे होते .त्यानंतर गोडे वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम होता. त्यानंतर आमचे दुसरे मित्र प्राचार्य सुभाष गवई यांच्या अर्धांगिनी रेडियंट हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांची प्रकृती पाहण्यासाठी आम्हाला जायचे होते. कार्यक्रम लागोपाठ होते. आम्हाला असं वाटलं की तापडिया परिवाराने आयोजित केलेला रक्तदानाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री सुदर्शन जैन परत जातील. पण त्यांनी तसे केले नाही. आमच्याबरोबर ते गोडे वैद्यकीय महाविद्यालयात आले .हे महाविद्यालय अमरावती पासून साधारणपणे दहा अकरा किलोमीटरवर आहे. तिथे असलेल्या सीनियर सिटीजन आरोग्य तपासणी मध्ये ते सहभागी झाले.
तोपर्यंत आम्हा सर्वांना भूक लागली होती. बरं घरी जायचे तर रेडियंटमध्ये जायचे राहून गेले असते. सुदर्शन जैन सरांनी ही बाब हेरली आणि नकळत त्यांची समोर असलेली गाडी एका हॉटेल जवळ थांबवली .आमच्या सर्व गाड्या थांबल्या. जैन सर गाडीतून खाली उतरले आणि म्हणाले थोडा अल्पोपहार करू या आणि आम्हा सर्वांना ते त्या उपहारगृहात घेऊन गेले. सुदर्शन जैन यांचा अल्पोपहार हा दीर्घापहार असते याची प्रचिती आम्हाला तर आलीच होती. इतरांनाही त्यादिवशी येऊन गेली.
असा हा जीवाभावाचा माणूस. भगवान महावीराचे नाव घेणे वेगळे आणि प्रत्यक्ष ते कृतीत उतरवणे वेगळे. हा माणूस भगवान महावीराचा असा वारसा खऱ्या अर्थाने चालवत आहे चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेवत आहे. परिवारामध्ये अनेक सुखदुःखाचे प्रसंग येतात .मित्रपरिवारामध्ये असे प्रसंग तर वारंवार येतात. पण हा माणूस त्यांच्याकडे जातो भेटतो त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करतो आणि प्रसंगी मदतही करतो. कधी कधी तर आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सामाजिक कार्यात असतो .आम्ही सुदर्शन जींना म्हणतो की सर आपण गेले तरी चालेल .ते म्हणतात नाही या कार्यक्रमासाठी आपण आलो आहे. तो कार्यक्रम संपल्याशिवाय मी जाणार नाही.

अमरावतीच्या प्राध्यापक मित्रांनी श्री सुदर्शन जैन यांचे ग्रंथालय जरूर पाहावे. काही महाविद्यालयाचे ग्रंथालय देखील त्यांच्या ग्रंथालय एवढे मोठे नसतील. सुसज्ज नसतील .पण जैन सरांनी आपला आत्मा त्या ग्रंथामध्ये ओतला आहे. पूर्ण एका मजल्यावर ग्रंथालय असलेले हे अमरावती शहरातील एकमेव घर आहे. बसण्याची सुसज्ज व्यवस्था आहेत. ग्रंथाला नामांकन केलेले आहे. ग्रंथ व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि त्या ग्रंथावर काढलेल्या नोट्स देखील अतिशय सुस्वरूप स्वरूपात सुदर्शन यांनी टिपून ठेवलेल्या आहेत. ग्रंथ असणे वेगळे .ते वाचणे अजून वेगळे .पण त्यांच्या नोट्स काढणे हा अतिशय अवघड प्रसंग आहे. अवघड गोष्ट आहे. कारण तुम्ही जेव्हा त्या ग्रंथातून काही बाबी टिपून घेतात त्यासाठी तो ग्रंथ तुम्हाला काळजीपूर्वक वाचावा लागतो. म्हणजे तुम्हाला बराच वेळ त्या ग्रंथ वाचनातून टिपण काढण्यात जातो. या माणसाचा तो व्यासंग आहे आणि म्हणूनच मी या लेखाला प्राध्यापक नसलेला प्राध्यापक असे शीर्षक दिले आहे आणि ते खऱ्या अर्थाने सार्थक आहे.

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *