नाशिक– येथील साहित्यसखी महिला साहित्यिक मंचचे सहावे राज्य महिला साहित्यसंमेलन रविवार दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे. ह्या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक नीरजा यांची सर्वानुमते निवड झाली असून कवयित्री संमेलनाध्यक्षा म्हणून ज्येष्ठ कवयित्री अलका दराडे यांना सन्मानित करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील लिहित्या महिला धडाडीने गेली काही वर्षे ‘साहित्यसखी’ ही साहित्य चळवळ एकत्रित येऊन जोमाने चालवत आहेत. पद्मश्री नारायण सुर्वे वाचनालय सभागृह, सिंहस्थ नगर,सिडको, नाशिक येथे १० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० ह्या वेळेत हे महिला साहित्यसंमेलन आयोजित केलेले आहे. दरवर्षी राज्यभरातील कानाकोपऱ्यातून महिला साहित्यिक ह्या संमेलनात सहभाग नोंदवीत असतात.
‘साहित्यसखी’ अभिव्यक्ती,आनंद आणि प्रबोधन ह्यासाठी स्वखर्चाने दरवर्षी हे साहित्यसंमेलन आयोजित करत असते. यंदा साहित्यसखीचे हे सहावे एकदिवसीय राज्य महिला साहित्य संमेलन आहे. यंदाच्या संमेलनाचा ड्रेस कलर कोड ‘गुलाबी’ आहे.
कवयित्री संमेलनात सहभागी होण्यासाठी तसेच संमेलनात महिला साहित्यिकांना पुस्तकप्रकाशन करावयाचे असल्यास तशी संमेलनपूर्व नोंदणी दि.१२ ते २२ ऑक्टो. २०२४ दरम्यान करणे आवश्यक आहे. त्यासाठी अलका कुलकर्णी (सचिव,साहित्यसखी) मो.९८५०२ ५३३५१ यांचेशी संपर्क साधावा. मुदतीनंतर कुणाचीही नावनोंदणी घेतली जाणार नाही. नाशिकनगरीत खास महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या ह्या सोहळ्यात जरुर सहभागी व्हा असे आवाहन साहित्यसखी अध्यक्षा डॉ.प्रतिभा जाधव, सचिव अलका कुलकर्णी व उपाध्यक्षा प्रा.सुमती पवार यांनी केले आहे.