Hurry Up Now The Deal is Here!

अमरावतीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गरीब वस्तीत राहणारी कु. पल्लवी देविदास चिंचखेडे ही मुलगी युपीएससीची आयएएस ही परीक्षा पास झाली आहे. तिचे वडील घराला रंगकाम देण्याचे काम करतात. तर तिची आई मशीनवर शिलाई काम करते. कुमारी पल्लवी ही अमरावती कॅम्प विभागातील बिच्छू टेकडी चपराशी पुरा या स्लम एरियामध्ये राहते. बिच्छू टेकडीतून पाहणाऱ्या नाल्याच्या काठावर तिचे घर आहे. एवढ्या आधुनिक काळातही तिच्या घराला जायला अद्यापही रस्ता नाही आहे.
ती जेव्हा सातव्या वर्गात होती तेव्हा मिशन आयएएस अमरावती या संस्थेने आयोजित केलेल्या सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्री तुकाराम मुंढे यांच्या अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी ती गेली होती. तिचे वडील तिला या कार्यशाळेला घेऊन गेले होते. या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाल्यामुळे तिचे वडील तिला दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या विद्यापीठ रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरातील डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी मध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांची भेट घेतली. श्री काठोळे सर हे गेल्या पंचवीस वर्षापासून गरीब व होतकरू विद्यार्थी यांना नाममात्र एक रुपया प्रतिदिन एवढ्या कमी शुल्कात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करतात. पल्लवीने त्यांचे मार्गदर्शन घेतले. प्रा. काठोळे यांनी तिला स्पर्धा परीक्षेची काही पुस्तके सप्रेम भेट दिली. त्यानंतर जेव्हा जेव्हा अमरावतीला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व्हायच्या तेव्हा तेव्हा तिने त्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेमध्ये भाग घेतला.
श्री तुकाराम मुंढे यांच्यापासून तसेच त्यांच्या भाषणापासून प्रेरणा घेऊन कुमारी पल्लवीने मी आयएएस अधिकारी होणारच असा निर्णय पक्का केला व त्या दृष्टिकोनातून तिने सातव्या वर्गापासूनच परीक्षेला तयारीला सुरुवात केली. तिच्या आजूबाजूला साधारणता मजूर वर्ग सामान्य कुटुंबातील लोक राहतात. त्यामध्ये सर्व समाजाचे लोक समाविष्ट आहेत. घरात पुरेशी जागा नाही. अभ्यासाचे वातावरण नाही पण त्या परिस्थितीवर मात करून तिने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून अमरावती शहराच्या इतिहासात एक मैंलाचा दगड रोवला आहे. ती ज्या भागात राहते त्या भागात अगोदर रान वन होते. त्या भागात विंचू जास्त निघायचे म्हणून त्या भागाला आजही बिच्छू टेकडी या नावाने ओळखले जाते. या टेकडी जवळच वडाळी नावाचा तलाव आहे.
पल्लवीच्या घरासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेलेला आहे. या मार्गावरून सतत ट्रकची येजा सुरू असते. त्यामुळे अभ्यास करताना सतत व्यत्यय येत असतो. पण अशा विपरीत परिस्थितीवर मात करून आज पल्लवी यूपीएससीची परीक्षा पास झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आपले वडील श्री देवीदासजी चिंचखेडे यांच्या प्रोत्साहनाला दिले आहे. अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने एका खाजगी कंपनीमध्ये तीन वर्ष नोकरी केली. परंतु त्यामध्ये तिचे मन रमले नाही. तिला तुकाराम मुंढे यांचे शब्द आठवत होते .मी आयएएस अधिकारी होणारच.
तिने नोकरीचा राजीनामा दिला व महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या बार्टी या शासकीय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आपले केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस या परीक्षेची तयारी पूर्ण केली. तिच्या या यशामुळे अमरावती शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉक्टर निधि पांडे. अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद. मिशन आय ए एस चे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी तिचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आहे.
अमरावती येथील सायन्स कोर या भव्य दिव्य मैदानात प्रशस्त अशा डोम मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत तिचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार करण्यासाठी सुप्रसिद्ध कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी व संपूर्ण भारतातून दहावी रँक प्राप्त झालेल्या अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीता मोहोपात्र यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाला तिवसा मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री राजेश वानखडे अचलपूर मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री प्रवीण तायडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीता मोहोपात्र डीआरडीए च्या मुख्य संचालिका श्रीमती प्रीती देशमुख मिशन आय ए एस चे संचालक प्रा डॉ. नरेशचंद्र काठोळे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री गायकवाड व पल्लवी चे वडील श्री देविदास चिंचखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंच सुप्रसिद्ध संचालिका श्रीमती पल्लवी यादगिरे यांनी केले. पल्लवीने आपल्या भाषणामध्ये उपस्थित समुदायाला मार्गदर्शन केले. तिचे भाषण संपल्यानंतर सभागृहातील उपस्थितांनी तिच्याबरोबर सेल्फी फोटो काढले तसेच तिला गराडा घालून तिच्या यशाची माहिती जाणून घेतली. अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून तिने संपादन केलेले आहे. त्यामुळे अमरावतीच्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा राहिला आहे. अमरावतीच्या विद्यमान आमदार श्रीमती सुलभा खोडके यांनी देखील तिला त्यांच्या शोध प्रतिष्ठानच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील भव्य कार्यक्रमात निमंत्रित केले असून तिने हे या संपादन केल्याबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *