Hurry Up Now The Deal is Here!

एम टी नाना उर्फ गाडगेबाबाएम टी नाना उर्फ गाडगेबाबा

आमदार प्राध्यापक बी टी देशमुख यांचे नाव कर्तव्यनिष्ठ आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व विधानसभा व विधान परिषदेमध्ये आदराने घेतले जाते .त्यांनी आमदार म्हणून केलेल्या कार्याचा गौरव सर्वत्र केल्या जातो. त्याचबरोबर त्यांचे लहान बंधू म्हणून एम टी उर्फ नाना देशमुख यांचा देखील गौरवाने उल्लेख केला जातो. त्यांनी प्राध्यापक म्हणून शिक्षक म्हणून चांगले काम केले यासाठी नाही तर त्यांनी गाडगेबाबा या आमच्या नाटकात काम करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रबोधनाचे काम केले आहे त्यामुळे.

डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर युग निर्माता नाटक बसवल्यानंतर आमच्यासमोर नाटक आले हे क्रांतयोगी गाडगेबाबा. युग निर्माता ह्या नाटकांमध्ये एम टी उर्फ नाना यांनी पंजाबराव देशमुख यांच्या वडिलांची भूमिका केली होती. गाडगे महाराज नाटक जेव्हा आम्ही बसवायला घेतले तेव्हा गाडगे महाराजांचे पात्र करण्यासाठी आमच्यासमोर नाव आले ते एम टी उर्फ नानासाहेब देशमुख यांचेच.

एमटी उर्फ नाना यांनी क्रांतीयोगी गाडगेबाबा या नाटकांमध्ये आपला प्राण ओतला. गाडगे बाबाच्या भूमिकेत इथे समरस झाले की गाडगे महाराजांच्या वेशभूषेमध्ये त्यांचा रंगमंचावर प्रवेश झाल्याबरोबर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. यापूर्वी देवकीनंदन गोपाला या चित्रपटांमध्ये डॉक्टर श्रीराम लागू यांनी श्री संत गाडगेबाबा यांची भूमिका केली होती .ती अप्रतिमच होती यात वाढ होण्याचे कारण नाही .पण वराडी भाषेची जी लकब आहे जो वराडी गोडवा तो होता तो नानांच्याच अभिनयात. त्यामुळे अल्पवधीत हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. खरं म्हणजे नाटक म्हणजे पुणे मुंबई हे समीकरण झाले आहे. पण क्रांतीयोगी गाडगेबाबांनी आमच्या विदर्भातील लोकांमध्ये अप्रतिम कला कौशल्य आहे हे सिद्ध करून दाखवले.

नाना माझे कौटुंबिक मित्र आहेत. त्यांच्या सौभाग्यवती रजनीताई देशमुख माझ्याच भारतीय महाविद्यालयामध्ये भूगोलाच्या प्राध्यापिका होत्या. नाना गाडगे महाराजांची भूमिका खऱ्या अर्थाने जगले. काही कलावंत नुसतं नाटकातच ती भूमिका करतात. प्रत्यक्ष त्यांचे जीवन वेगळे असते .पण नानांनी या भूमिकेला न्याय दिला आणि प्रत्यक्ष जीवन देखील तसेच जगले .त्यामुळे रंगमंचावर दिसणारे नाना आणि लोक माणसांमध्ये दिसणारे नाना यामध्ये फारसे अंतर नव्हते .त्यामुळेच लोकांनी क्रांतीयोगी गाडगे बाबा या नाटकाला डोक्यावर घेतले.

गाडगेबाबा नाटकाच्या यशानंतर त्यांना भरपूर ऑफर आल्या. श्री संत गजानन महाराज. अवतार मेहेर बाबा ह्या दोन भूमिका देखील त्यांच्या वाट्याला आल्या. त्यामध्ये देखील नाना तेवढे रममान झाले. गजानन महाराजांच्या वेशभूषा मध्ये त्यांनी घेतलेली एन्ट्री ही लोक विसरू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागला .सराव करावा लागला. त्यामध्ये ते कधीही मागे पुढे पाहत नाही. सराव म्हणजे सराव नाटक म्हणजे नाटक त्यामध्ये तडजोड नाही. त्यामुळे नाना जे भूमिका करतात ती भूमिका मनाला स्पर्श करून जाते ती कायमची.
विदर्भात नाटक बसवणे म्हणजे ही एक कसरतच असते. पुण्या मुंबईला सर्व तयार असतात. कलावंत दिग्दर्शक नेपथ्यकार संगीतकार सर्वजण तंतोतंत वेळेवर येतात. तांत्रिक बाजू सांभाळणारी तेवढी समर्थ मंडळी असते. इथे तर भूमिका ही करावी लागते तांत्रिक बाबी सांभाळावया लागतात आणि वेळप्रसंगी सामानही उचलावे लागते. पण आम्ही ते सर्वजण आनंदाने करतो. नाना देखील आम्हाला हातभार लावतात. मी नाटकातला मुख्य कलाकार आहे. भूमिका करणार आणि जाणार ही भूमिका ती कधीच उठवत नाहीत .त्यामुळे ते कलावंतामध्ये लोकप्रिय आहेत.
मी युग निर्माता संगीत सौभद्र क्रांतियोगी गाडगेबाबा या नाटकाचा मुख्य निर्माता.नाटकात काम करणाऱ्या कलाकारांवर मला एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल इतके बरे वाईट अनुभव आहेत. पण माझे आणि नानाचे अनुभव चांगलेच आहेत. नानांनी चुकूनही मला हलके काम सांगितले नाही. उलट मी त्यांच्यापेक्षा वयाने तीन-चार वर्षांनी लहान आहे. त्या मान मर्यादेचे त्यांना भान आहे आणि म्हणूनच आमदार बी टी देशमुखांचे नाव ज्या दमदारपणे महाराष्ट्रात घेतले जाते त्याच्या खालोखाल त्यांचे कनिष्ठ बंधू प्राध्यापक एम टी उर्फ नानासाहेब देशमुख त्यांचे नाव देखील त्याच तोला मोलाने घेतले जाते.

आता नाना ओळखले जातात ते गाडगेबाबा म्हणून. कुठेही गेले तर गाडगेबाबा आले असेच लोक म्हणतात .
नानांनीही ते स्वीकारले आहे. त्यांना जाणीव आहे की मी या भूमिकेमध्ये प्राण ओतला आहे म्हणूनच लोक मला गाडगेबाबा म्हणतात. हा एवढा मोठा पट्टीचा कलावंत पण निमंत्रण आले की कुठेही जातो. त्यासाठी मानधनाची अपेक्षा ठेवत नाही. त्यासाठी प्रवास भाड्याची अपेक्षा ठेवत नाही .जो दे उसका भी भला जो न दे उसका भी भला. नाटकाच्या माध्यमातून बालगंधर्वांनी अमरावतीच्या भरोशावर त्यांचे कर्ज फेडले आहे. पण नाना दोन बोटे पुढेच आहेत. नाटकाच्या माध्यमातून त्यांना पैसा जोडता आला नाही. पण माणसे जोडण्यात त्यांच्या इतका पटाईत माणूस शोधूनही सापडणार नाही.
असे आमचे हे ज्येष्ठ मित्र. नुसतं एमटी म्हटलं तर अमरावती शहरात त्यांना कोणीही ओळखते. नानांनी नुसतं नाटकेच गाजवली नाहीत तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वेगवेगळ्या प्राधिकरणावर त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. ते ज्या ज्या समितीवर होते त्या समितीला त्यांनी न्याय दिला आहे. मी शिक्षक आमदार पदवीधर आमदार लोकप्रिय आमदार प्राध्यापक बी टी देशमुख यांचा बंधू आहे. याचा त्यांनी कधीही दुरुपयोग केलेला नाही आणि तो त्यांचा स्वभाव पण नाही.

नाना एक वेळ माझ्या घरी आले. माझी नात स्वधा तेव्हा थोडी तोतरी बोलत होती . ती तेव्हा चार पाच वर्षाची होती. नानांनी ते हेरले. नानांनी होमियोपॅथी चा खूप अभ्यास केला आहे. ते म्हणाले काठोळे मी तोतरेपणा घालवू शकतो. मी औषध तयार करतो आणि पाठवतो. मी म्हटलं मी घ्यायला येईल .नाना म्हणाले नाही तुम्ही एवढे चांगले काम करता.माझा ड्रायव्हर ते औषध तुमच्याकडे नियमित आणून देईल. आता माझे नात चौथ्या वर्गातून पाचव्या वर्गात जाणार आहे. तिचा तोततरेपणा पूर्ण गेला आहे. पण या कामात नानांनी जो पुढाकार घेतला तो निश्चितच लक्षात राहण्यासारखा आहे.
श्री संत गाडगेबाबा यांची भूमिका करणारे नाना त्यामुळे आमच्या संपूर्ण परिवारात तसेच मित्रपरिवार यामध्ये लोकप्रिय मित्र म्हणून कायम आहेत. अशा आमच्या या गाडगेबाबा मित्राला आमच्या सर्वांचा मानाचा मुजरा.

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *