Hurry Up Now The Deal is Here!

मा. श्री तुकाराम मुंढेसाहेबांचा हे जेव्हा आयएएस झाले त्या वर्षी म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी सत्कार केला होता आणि आणि आज त्यांचे कार्य पाहून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो .मिशन आयएएसचे उद्घाटन सध्याचे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव मा.श्री विकास खारगेसाहेब यांनी 12 मे 2000 ला केले .तेव्हापासून तर 25 वर्षापर्यंत आम्ही दरवर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत आहोत . साधारणपणे आतापर्यंत 373 आयएएस आयपीएस आयएएस सनदी व राजपत्रित अधिकारी आमच्या या उपक्रमात सहभागी झाले आहेत. श्री तुकाराम मुंढेसाहेब जेव्हा आयएएस झाले .तेव्हा मी सत्कारासाठी यांना फोन लावला .साहेब तेव्हा खूपच व्यस्त होते .पण ते तळमळीने म्हणाले काठोळेसर आज शब्द देत नाही .पण येण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि एक दिवस मा. श्री तुकाराम मुंढेसाहेबांचा फोन आला .म्हणाले. मी तुमच्या अमरावतीच्या कार्यक्रमाला येतो .

  कार्यक्रमाच्या दिवशी श्री तुकाराम मुंढेसाहेब  औरंगाबादवरून बसने आले . मी त्यांना माझी स्कूटर घेऊन त्यांना घ्यायला गेलो .माझ्या स्कूटरवर बसून आम्ही घरी आलो . श्री तुकाराम मुंढे येणार हे  बऱ्याच लोकांना त्यांच्या मित्रमंडळींना माहीत होतं .अमरावतीचे त्यांचे मित्र श्री संदीप राठोड श्रीमती कुसुम राठोड सध्या चर्चेत असलेले नागपूरचे आयपीएस अधिकारी  व सध्या उत्तराखंडमध्ये आयजी पोलीस महासंचालक असलेले श्री निलेश भरणेसाहेब ही सगळी मंडळी माझ्या घरी आली. सत्कारासाठी पुणे येथून श्री श्याम देशपांडे आयपीएस हर्षद वेंगुरलेकर आयआरएस आणि इतर मंडळी माझ्याकडे पोहोचली .तेव्हा साधन सामग्री फार नव्हती .माझ्याकडे कार पण  नव्हती. सर्व व्यवहार मी आणि माझे कार्यकर्ते टू व्हीलर वर करीत होतो .    श्री निलेश भरणेसाहेब आयपीएस यांनी नागपूर वरून येताना मारुती व्हॅन आणल्यामुळे ती आमच्या पाहुण्यांच्या उपयोगी पडली .

   सत्काराचा हा कार्यक्रम अमरावतीच्या मोर्शी रोडवरील महाराष्ट्रातील सर्व सभागृहात भव्य असलेल्या श्री संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक  भवनामध्ये झाला . श्री तुकाराम मुंढे साहेबांचे भाषण सर्वांना मनापासून आवडले .सर्व सत्कारमूर्ती श्री निलेश भरणे श्री श्याम देशपांडे श्री हर्षद वेंगुरलेकर यांची देखील भाषणे झाली. स्पर्धा परीक्षेचा तो सुरुवातीचा काळ होता .व्यापक प्रमाणात जनजागृती झाली नव्हती.  मिशन आय ए एस ने तो भार उचलला होता. माननीय श्री तुकाराम  मुंढेसाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी सभागृह वर्गात भरले होते. या सभागृहामध्ये कुमारी पल्लवी चिंचेकडे नावाची सातवा वर्ग शिकणारी गरीब घरची विद्यार्थिनी होती. या भाषणामुळे तिला प्रेरणा मिळाली. दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडे आली. या भाषणापासून प्रेरणा घेऊन तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि आता ती केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा उत्तीर्ण होऊन सनदी अधिकारी म्हणून दिल्लीला रुजू झालेली आहे .इतके मुंढे साहेबांचे भाषण प्रभावी झाले .या भाषणातून पल्लवी चिंचखेडे नावाची मुलगी  सनदी अधिकारी घडली हे सर्वात महत्त्वाचे आहे.


      साहेब सोलापूरला जिल्हाधिकारी असताना त्यांनी पंढरपूरच्या वारी दरम्यान घेतलेला निर्णय आजही सर्वांच्या स्मरणात आहे. पंढरपूरच्या वारीला लाखो लोक भारताच्या कानाकोपऱ्यातून येतात. मुंढे साहेब जिल्हाधिकारी येण्याअगोदर पंढरपूरचे मंदिर अकरा वाजता बंद होत होते. तसेच मा .मुख्यमंत्र्यांच्या व विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षाच्या  पूजेला खूपच वेळ लागायचा. अकरा वाजता मंदिर बंद झाले म्हणजे जे लोक दर्शनासाठी लाईनमध्ये उभे आहेत त्यांना पण दर्शन घेणे शक्य व्हायचे नाही. त्यांना परत दुसऱ्या दिवशी लाईनमध्ये उभे राहावे लागत होते. इतक्या लांब प्रवास करून आलेल्या भाविकांना लाईनमध्ये उभे राहूनही मंदिर अकरा वाजता बंद झाल्यामुळे दर्शन व्हायचे नाही .साहेबांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी लगेच सर्व पुजाऱ्यांची सभा घेतली. 

      मा.मुख्यमंत्र्यांची पूजा तसेच विश्वस्तांच्या अध्यक्षांची पूजा लवकर व्हावी यासाठी त्यांनी सतत पुजाऱ्यांची प्रॅक्टिस घेतली. त्यामुळे पूजेचा कालावधी एक तासाने कमी झाला. तसेच अकरा वाजता मंदिर बंद होण्याच्या वेळेस रांगेमध्ये जेवढे लोक अकरा वाजता उभे आहेत तेवढ्यांचे दर्शन झाल्याशिवाय मंदिर बंद होणार नाही हा नवा पायंडा त्यांनी पाडला. त्यामुळे पंढरपूरच्या मंदिरामध्ये लाखो भाविकांची सोय झाली. सुरुवातीला पंढरपूरच्या मंदिराच्या विश्वस्थानी त्यांनी विरोध केला. पण सोलापूरचे जिल्हाधिकारी असलेले श्री तुकाराम मुंढेसाहेब आपल्या निर्णयावर ठाम राहिले. शेवटी विश्वस्त नमले आणि मुंढेसाहेबांना त्यांनी होकार दिला. 

   आम्हाला आज अभिमान वाटतो की महाराष्ट्रात श्री तुकाराम मुंढेसाहेब जे काम करीत आहेत ते निश्चितच गौरवास्पद आहेत . त्यांच्या कार्याचा अभिमान आहे आणि या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचा आम्ही पंधरा वर्षापुर्वी मिशन आय ए एस  तर्फे सत्कार केला याचा आम्हाला अभिमान आहे . सातत्याने चांगले काम करणाऱ्या व सर्व सामान्य साठी भारतीय संविधानाचा वापर करून नवा पांडा पाडणाऱ्या आणि सनदी अधिकाऱ्यांमध्ये तसेच जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या  श्री तुकाराम मुंढे साहेब यांना  शुभेच्छा देतो .               

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *