अमरावतीच्या वैभवात अजून भर पडणार : क्षितिज गुरभेले भावी कॅबिनेट सेक्रेटरी
महाराष्ट्रातील अमरावती हे गाव तसे चर्चेत असणारे गाव या शहराने डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रपती महामहिम श्रीमती प्रतिभाताई पाटील राज्यपाल श्री रा सू गवई कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्यासारखी रत्ने संपूर्ण देशाला दिलेली आहेत.14 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे न्यायमूर्ती श्री भूषण गवई हे देखील अमरावतीचेच आहेत.मातोश्री लेडी गवर्नर डॉ. कमलताई व माजी राज्यपाल श्री रा.सू.गवई यांचे ते चिरंजीव .या वैभवात भविष्यात अजून एक भर पडणार . ती भर मोलाची आहे. अतिशय कमी वयात आय ए एस ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे व गुणवत्तेनुसार भविष्यात अमरावतीचा विद्यार्थी हा प्रशासनातील सर्वोच्च पदापर्यंत जाणार आहे.या आय ए एस झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे श्री क्षितिज गुरुभेले. कॅबिनेट सेक्रेटरी होण्यासाठी लवकर म्हणजे कमी वय असताना आयएएस होणे गरजेचे असते.यापूर्वी 2012 यावर्षी आयएएस झालेले व संपूर्ण देशातून दहावा क्रमांक प्राप्त केलेले महाराष्ट्राचे सुपुत्र पुण्याचे श्री अमृतेश औरंगाबादकर हे देखील कॅबिनेट् सेक्रेटरी होऊ शकतात. त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडून सातव्या वर्गापासूनच आय ए एस ची तयारी करून घेतल्यामुळे ते 22 व्या वर्षी आयएएस झालेले आहेत.
वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस होऊन अमरावतीच्या यशोदा नगर बायपास रोड वरील चैतन्य कॉलनीतील शांतीनगर मध्ये “पाऊल “या निवासस्थानी राहणाऱ्या क्षितिज संजय गुरभेले या विद्यार्थ्याने आयएएसच्या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केलेले आहे .कोणत्याही प्रकारचा शिकवणी वर्ग न लावता घरीच अभ्यास करून त्याने हे यश संपादन केलेले आहे . यशोदा नगर हा भाग या भागात असलेल्या प्रसिद्ध अशा भिमटेकडी यामुळे प्रसिद्ध आहे. आजूबाजूला सर्वसामान्य पण बुद्धिमान लोक अमरावतीच्या यशोदा नगर चौकामध्ये दररोज मजुरांचा बाजार भरतो.तसा हा सामान्य पण कर्तृत्ववान भाग. या भागातील विद्यार्थी आणि तोही भाड्याच्या घरात राहणारा आयएएस झाला ही खरोखरच इतिहासात नोंद करण्यासाठी योग्य बाब आहे. क्षितिज ने यश संपादन केले आहे ते निश्चितच अभूतपूर्व व नोंद घेण्यासारखे आहे म्हणूनच अमरावतीच्या मिशन आय ए एस तर्फे त्याच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला आहे .
क्षितिजने आयआयटी रुडकीवरून पदवी प्राप्त केली. आयआयटी करणारे विद्यार्थी तत्पर तेजस्वी व तपस्वी असतात त्यामुळे पदवी प्राप्त होण्याआधीच त्यांच्या हातात नोकरीची ऑर्डर आलेली असते. तसेच सिटिजचे झाले. त्याला चांगल्या पगाराची नोकरी चालून आली पण त्याला प्राप्त झालेली सत्तावीस लाख रुपयांची नोकरी त्याने नाकारली व आय ए एस च्या तयारीला सुरुवात केली व पहिल्याच प्रयत्नामध्ये आयएएस प्राप्त केले .वयाच्या २४ व्या वर्षी आयएएस होणारा हा अमरावती शहरातील पहिला विद्यार्थी आहे.
त्याचे वडील अमरावतीच्या श्याम चौकातील बी एस एन एल कार्यालयात मुख्य लेखाधिकारी म्हणून कार्यरत असून क्षितिज हा मूळचा भोपाळचा राहणारा आहे. वडीलांची अमरावती येथे १९७१ यावर्षी बदली झाली आणि भोपाळचे कुटुंब अमरावतीला आले. दिल्लीला जाऊन अभ्यास केल्यापेक्षा अमरावतीलाच आपल्या घरी आपल्या परिवारात राहून त्याने हे यश संपादन केलेले आहे .खरं म्हणजे हे सर्व करण्यासाठी त्याला कुठल्याही अकादमीची किंवा कुठल्या तज्ञ माणसाची मदत घेण्याची गरज भासली नाही. स्वबळावर त्याने हे यश संपादन केलेले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याने हा अभ्यास केलेला आहे. मिशन आय ए एस चे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे व उपसंचालक डॉ. मंगेश देशमुख चैतन्य कॉलनीतील शांती नगर भागात जाऊन त्याच्या पाऊल या निवासस्थानी त्याचा शाल व पुस्तके देऊन सत्कार केला.
मिशन आय ए एस ने दुसऱ्या वर्गापासून प्रारंभ केलेला ज्युनिअर आयएएस हा प्रकल्प अतिशय चांगला असून विद्यार्थ्यांना दिशादर्शक आहे. मला अशा प्रकारचे मार्गदर्शन शालेय जीवनात मिळाले असते तर मी याहीपेक्षा लवकरच आय ए एस झालो असतो असा अभिप्राय त्याने यावेळेस दिला .अगदी अल्प कालावधीमध्ये क्षितिजने जे यश संपादन केलेले आहे त्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत असून सध्या त्याच्या घरी येणाऱ्या व त्याचे अभिनंदन करणाऱ्या लोकांची व संस्थांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे. मिशन आय ए एस ने त्याच्या वडिलांचा व आई सुनिताताईंचा व बहीण कुमारी आदिती यांचाही सन्मान केला. क्षितिज हा अमरावतीचा सुपुत्र असून मिशन आय ए एसच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तो मिशन आयएएसने आयोजित केलेल्या ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराला भेट देऊन त्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणार आहे . विशेष हे की अमरावतीकरांसाठी क्षितिज हा जरी आयएएस ही महत्त्वाची परीक्षा पास झाला असला तरी अमरावतीला व इतरत्र आयएएस करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तो तत्पर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा त्याच्यावर प्रचंड प्रभाव आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे अभ्यासाला झोकून दिले होते त्याप्रमाणे क्षितिजने स्वतःला झोकून देऊन हे यश संपादन केलेले आहे. खरं तर ही परीक्षा पास करण्यासाठी मुले पुणे मुंबई दिल्ली हैदराबाद मद्रास अशी गावे गाठतात .त्यामध्ये त्यांचे लाखो रुपये खर्च होतात. पण लाखो रुपये खर्च न करता आणि कोणत्याही मोठ्या शहरात न जाता तुम्ही प्रमाणिकपणे निष्ठेने सातत्याने अभ्यास केला तर तुम्ही देखील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता हा आदर्श क्षितिजने स्वतः ही परीक्षा पास करून दाखवली आहे. क्षितिज अभ्यासामध्ये मग्न असला तरी रविवारी मात्र तो कोणताही प्रकारचा अभ्यास करायचा नाही. रविवारी अमरावती शहरला लागून असलेल्या छत्री तलावाच्या जंगलात तो जायचा .तिथे पक्षी निरीक्षण करायचा . बरेचसे पक्षी त्याने आपल्या कॅमेरा मध्ये टिपले आहेत. तो आय आय टी झाल्यानंतर व स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागल्यानंतर वडिलांनी त्याला दोन ड्रेस शिवून दिलेले होते आणि तंबी दिली होती की तू स्पर्धा परीक्षा पास झाल्याशिवाय मी तुला नवीन ड्रेस घेऊन देणार नाही. आपल्या वडिलांनी आपल्या प्रेमाखातर हा संकल्प आपल्यासमोर ठेवलेला आहे याची जाणीव क्षितिजला होती. आणि म्हणूनच त्याने पहिल्याच प्रयत्नामध्ये आयएएस ही अवघड परीक्षा उत्तीर्ण होऊन अमरावतीच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे . क्षितिज आय ए एस झाला त्या दिवसाची गोष्ट महत्त्वाची आहे. क्षितिजने आपला निकाल आय ए एस चा इंटरनेटवर पाहिला. त्यात त्याला त्याचे नाव दिसले.आपली रॅक त्याला कळाली. आई आणि बहीण घरीच होते. बाबा मात्र कार्यालयात गेले होते. वेळ दुपारची .बाबा घरी यायला सायंकाळ होणार म्हणून त्याने तडक स्कूटर काढली. अमरावतीच्या श्याम चौकातील भारत संचार निगम अमरावतीचे कार्यालय त्याने गाठले. बाबांचे कार्यालय वरच्या मजल्यावर होते. तो तडक कार्यालयात गेला. आपला मुलगा असा तडकाफडकी कार्यालयात आलेला पाहून वडिलांनाही नवल वाटले. वडिलांनी विचारले तू कसा काय आला आहेस ? पण या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी क्षितिज म्हणाला तुमच्या कार्यालयात एखादा आयएएस अधिकारी आला तर तुम्हाला काय करावे लागते. त्याचे वडील देखील चळवळीतील आहेत .सतर्क पालक आहेत .त्यांना एकदम करंट लागला आणि ते पटकन उभे राहिले. त्यांच्या लक्षात आले की आपला मुलगा कलेक्टर झालेला आहे. उभे राहून त्यांनी क्षितिजला मिठी मारली आणि त्याचे अभिनंदन केले. त्या ठिकाणी भारत संचार निगम कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्वांनी एकच जल्लोष साजरा केला. क्षितिजचे पहिले स्वागत झाले ते असे.
प्रत्येक अमरावतीच्या नव्हे भारतातील मुलांनी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे असामान्य कर्तृत्व त्याने विपरीत परिस्थितीत आयएएस करून अमरावतीत राहून व कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावून केलेले आहे. हा साधा सरळ असणारा मुलगा भारताच्या सर्वोच्च प्रशासकीय पदावर भविष्यात जाणार आहे. कॅबिनेट सेक्रेटरी होणार आहे .त्याची पाळेमुळे त्याने अमरावतीच्या यशोदा नगर सारख्या सर्वसामान्य भागात राहून घट्ट रोवली आहेत. त्याने अमरावतीचे नाव उंचीवर नेऊन ठेवले आहे.
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003