Hurry Up Now The Deal is Here!

8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या महिला दिनाच्या सप्ताह निमित्त आज आम्ही संघर्षातून आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांचा हा परिचय करून देत आहोत. अशा प्रकारचे महिला आयएएस, आयपीएस, आय आर एस, सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील लेख आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा आठवा लेख. ( सौजन्य- मिशन आयएएस अमरावती 9890967003

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील हिवरखेड या ग्रामीण भागात राहणाऱ्या आय ए एस अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांची माझी पहिली भेट 22 वर्षांपूर्वी म्हणजे 10 ऑगस्ट 2002 रोजी अमरावती येथे माझ्या महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगर येथील निवासस्थानी झाली.झाले असे की आम्ही एक मे 2000 रोजी विदर्भातील मुले बहुसंख्येने प्रशासनात जावीत म्हणून महाराष्ट्राचे सध्याचे अपर मुख्य सचिव व तेव्हाचे जिल्हाधिकारी श्री विकास खारगे यांच्या हस्ते अमरावतीला डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीची स्थापना केली. त्यानंतर 10 ऑगस्ट 2002 रोजी आम्ही सध्याचे संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी व बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री सदानंद कोचे यांच्या हस्ते अमरावतीला स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेची सुरुवात केली. पहिल्याच दिवशी पहिलीच विद्यार्थिनी म्हणजे भाग्यश्री बानायात .भाग्यश्री मला म्हणाली सर मी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे राहत आहे. सध्या मी महाविद्यालयात शिकत आहे. माझी आई आजारी असते. भाग्यश्री आमच्या निवासस्थानाच्या बाजूलाच असलेल्या अप्रतिम कॉलनीमध्ये ती राहत होती.

वडील अध्यापक. मुख्याध्यापक. पण आई सतत आजारी असायची. वडिलांनी एक काम केले. भाग्यश्रीला स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख करून दिली आणि तिला शाळेत असताना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा उपक्रमांमध्ये भाग घेण्यास सांगितले. त्याचबरोबर शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामध्ये तिला सहभागी होण्यास सांगितले .

एक दिवस तिच्या वडिलांचे एक विद्यार्थी जे तेव्हा ठाणेदार झाले होते तिच्या वडिलाला भेटायला आले आणि त्यांनी तिच्या वडिलांना जोरदार सॅल्यूट मारला आणि ते ठाणेदार म्हणाले सर मी तुमच्यामुळे घडलो.. भाग्यश्रीला हा प्रसंग प्रेरणादायी वाटला.

या प्रसंगातून तिचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू झाला . मोरशी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी राहून अभ्यास करणे म्हणजे अवघडच काम .पुस्तके नाहीत. सभोवतालचे वातावरण स्पर्धा परीक्षेच्या अनुकूल नाही. पण श्रृंखला पायीच असू दे मी गतीचे गीत गाईन दुःख झेलण्यासाठी आसवांना वेळ नाही या न्यायाने भाग्यश्री झुंज देत राहिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत राहिली. मध्यंतरी आजारी असलेल्या आईची सेवा करीत राहिली. वडिलांचे आकस्मिक निधन झाले. जवळच्या नातेवाईकांनी ही सेवा करण्यासाठी आग्रह धरला.
घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी अशी परिस्थिती झाली. मदत करण्याऐवजी हिस्से वाटणी करण्यासाठी नातेवाईक पुढे आले. पण भाग्यश्रीने हार मानली नाही. कोशिश करने वालो की कभी हार नही होती. पंख होने से कुछ नही होता हाऊसोलो से उडान होती है या न्यायाने भाग्यश्री संकटावर मात करीत राहिली. पहिली नोकरी मिळाली ती अमरावतीला विषय तज्ञ म्हणून. अमरावती ते मोर्शी हे अंतर 55 किलोमीटरचे आहे. रोज 55 किलोमीटर येणे आणि जाणे. आजारी आईची सेवा करणे. हे व्रत तिने स्वीकारले. पण या व्रताबरोबरच तिने स्पर्धा परीक्षेचा व्यासंग सोडला नाही .राजपत्रित अधिकाऱ्यांची परीक्षा तिने दिली आणि बघा कुठल्याही प्रकारचा फारसे मार्गदर्शन नसताना परिस्थिती अनुकूल नसताना नोकरी करीत असताना तिने संपूर्ण महाराष्ट्रातून ओबीसी विद्यार्थ्यांनी मधून पहिला क्रमांक प्राप्त केला .

जितने वाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग से करते है
याच्या प्रत्यय तिने आपल्या जिद्दी स्वभावातून आणून दिला .ती राजपत्रितअधिकारी झाल्यानंतर तिच्या सभोवतालचे वातावरण बदलले. स्पर्धा परीक्षेसाठी अनुकूल असे वातावरण होते. ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मार्फत नागपूर येथे विक्रीकर कार्यालयात विक्रीकर सहाय्यक आयुक्त म्हणून रुजू झाली . तिचे सहकारी तिला म्हणायला लागले. भाग्यश्री मॅडम तुम्ही जर एमपीएससी परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्या येऊ शकता तर तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस या परीक्षेची तयारी का करीत नाही. भाग्यश्री तर महत्त्वाकांशी मुलगी. तिला हे पटले. आणि तिने नागपूरला सेवेत असताना आयएएस ची तयारी सुरू केली. तिच्या मदतीला तिच्याच कार्यालयात सनदी अधिकारी असलेले श्री संजय धिवरे यांनी केला मोलाची मदत केली. सर्व प्रकारची पुस्तके सर्व प्रकारच्या नोट्स आणि मुलाखतीसाठी सर्व तयारी त्यांनी तिच्याकडून करून घेतली .

सेवेत असल्यामुळे पुण्या मुंबईला दिल्लीला जाणे तिला शक्य नव्हतं .शिवाय आईचे आजारपण .बाबा नसल्यामुळे आईकडे लक्ष देणे देखील गरजेचे होते. भाग्यश्रीच्या परिश्रमाला यश आले आणि भाग्यश्री केंद्रीय लोकसेवा आयोगाची पहिली परीक्षा दुसरी परीक्षा पास झाली. मॉक इंटरव्यू देण्यासाठी दिल्लीला जाणे गरजेचे होते .पण नोकरीमुळे ते शक्य होत नव्हते. पण श्री संजय धिवरे यांनी तिची नागपुरातच मुलाखतीची तयारी करून दिली. ती आपला जीवनपट आपल्या नजरे खालून घालत होती. तिला यश समोर दिसत होते.

. दिल्लीला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भावनांमध्ये ती इंटरव्यूला गेली. समोरचे पॅनल कडक होते .कमी मार्क्स देण्यामध्ये त्या पॅनलचा नावलौकिक होता. भाग्यश्रीने कोणताही ताण तणाव न ठेवता प्रामाणिकपणे मुलाखत दिली तिने सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे तर दिलीच. पण त्यांना प्रतिप्रश्नही केले .सहसा मुलाखतीमध्ये प्रतिप्रश्न करण्याची प्रथा नाही. पण भाग्यश्रीने ती मोडीत काढली. मुलाखतीमधील एका सदस्याने तिला विचारले तुम्ही सनदी अधिकारी झाल्यानंतर प्रामुख्याने कोणता प्रश्न हाताळणारा आहात. ती म्हणाली मी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा प्रश्न हाताळणार आहे. सदस्य म्हणाले इतरही बरेच प्रश्न आहेत. तुम्ही शेतकऱ्यांकडेच का लक्ष देणार आहात. भाग्यश्री म्हणाली सर या जगाचा अन्नदाता शेतकरी आहे .आमच्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रमाण फार मोठे आहे आणि म्हणून या अन्नदात्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे मला गरजेचे वाटते .

मुलाखत देऊन जेव्हा भाग्यश्री बाहेर आली .तेव्हा तिला फारशी यशाची अपेक्षा नव्हती. कारण तिने पॅनलमध्ये सदस्यांना प्रतिप्रश्न केले होते .पण तिने मांडली भूमिका ही सत्याची न्यायाची व नीतीची होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. आणि आमची भाग्यश्री आय ए एस अधिकारी झाली. भाग्यश्री आज सर्व सामाजिक माध्यमावर तिच्या व्याख्यानामुळे तिच्या यशोगाथेमुळे चर्चेत आहे. तिची यशोगाथा ही प्रत्येक मुला मुलींसाठी प्रेरणादायी आहे. आज तर सर्वत्र स्पर्धा परीक्षेचे पेव फुटलेले आहे आणि भाग्यश्री जेव्हा तयारी करीत होती .तेव्हा साधी पुस्तके देखील मिळवणे कठीण झाले होते. पण तिने त्यावर मात करून यश संपादन केले .आजही भाग्यश्री सनदी अधिकारी झाली तरी तुम्ही तिला भेटायला गेले तर आपण एका मित्राला भेटत आहोत. आपण मोठ्या बहिणीला भेटत आहोत. असाच भास तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही .

परवा आम्ही आमची अमरावतीची सुकन्या व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून पहिली आलेली सृष्टी देशमुख हिचा अमरावतीला भव्य सत्कार केला. भाग्यश्रीलाही बोलावले .भाग्यश्रीचे बाळ तेव्हा लहान होते. तरी पण तिने नकार दिला नाही. ती कार्यक्रमाला आली. तिने केलेले मार्गदर्शन ऐकण्यासाठी सभागृहामध्ये पाय ठेवायला जागा नव्हती .मी जेव्हा जेव्हा भाग्यश्री मॅडमला फोन करतो आणि कार्यक्रमाला बोलावतो तो कार्यक्रम लहान आहे की मोठा आहे याचा विचार न करता भाग्यश्री मॅडम माझ्या कार्यक्रमाला येतात. मुलांना मार्गदर्शन करतात. आणि नवीन पिढीला दिशा देऊन जातात. नाशिकला म्हणून येण्यापूर्वी भाग्यश्री मॅडम शिर्डी संस्थानला मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. तत्पूर्वी नागपूर येथे रेशीम संचालनालयामध्ये संचालक म्हणून कार्यरत होत्या.. त्यांची दोन्ही ठिकाणची कार्यकाळ ही त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या विभागांमध्ये नावलौकिक मिळवून गेले. आज सर्वत्र जागतिक महिला दिन सप्ताह संपन्न होत आहे….अशा या महिला दिनाच्या सप्ताह निमित्त भाग्यश्री मॅडमला हार्दिक शुभेच्छा व विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन त्यांनी यश संपादन केले त्यानिमित्त त्यांना मानाचा मुजरा.

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प महाराष्ट्र
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *