Hurry Up Now The Deal is Here!

8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या महिला दिनाच्या सप्ताह निमित्त आज आम्ही अमरावतीच्या जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती वर्षा भाकरे यांचा हा परिचय करून देत आहोत. अशा प्रकारचे महिला आयएएस, आयपीएस, आय आर एस, सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील लेख आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा सातवा लेख. ( सौजन्य- मिशन आयएएस अमरावती 9890967003)

काही वर्षांपूर्वी वर्षा भाकरे व त्यांचे प्राध्यापक यजमान हे मला अमरावतीला माझ्या महापौर बंगल्यासमोर जिजाऊ नगरात असलेल्या निवासस्थानी भेटावयास आले .वर्षाताई तेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. आणि त्यांचे यजमान हे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. वर्षाताई अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सांगळूद या गावामध्ये जिल्हा परिषदेमध्ये अध्यापिका कार्यरत होत्या .हे गाव साधारणपणे अमरावती वरून 60 ते 62 किलोमीटर दूर आहे. मला भेटल्यानंतर त्यांनी सांगितले सर मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. मला मुलाखतीला जावयाचे आहे .त्यासाठी मी तुमचे मार्गदर्शन घेण्यासाठी आली आहे .आमच्या अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीला मिशन आयएएस हा प्रकल्प सुरू करून फार थोडा कालावधी झालेला होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा प्रकल्प नावलौकिकास होता आणि तो नावलौकिक पाहूनच वर्षाताई आमच्याकडे आलेल्या होत्या. वर्षाताईंच्या मा़ँक इंटरव्ह्यूची तयारी मी आमच्या इतर जेष्ठ सहकारी जे माझ्यापेक्षा या क्षेत्रात ज्येष्ठ होते त्यांच्यामार्फत त्यांच्या परीने करून देण्याचा प्रयत्न केला. वर्षाताई मुळातच तत्पर तेजस्वी तपस्वी अभ्यासू जिद्दी होत्या. त्यामुळे कळतच निकाल अनुकूल आला .आज जेव्हा मी त्यांच्या जीवनाकडे वळून पाहतो तेव्हा मला नवल वाटते आणि आनंदही होतो. एक ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कार्यरत असलेली अध्यापिका आज एक चांगली राजपत्रित अधिकारी म्हणून काम करीत आहे .वर्षाताईची शैक्षणिक पार्श्वभूमी ही अतिशय चांगली. बारावीला चांगले मार्क्स पडले आणि ज्या काळात त्या बारावी झाल्या तो काळ असा होता की बारावीला चांगले टक्केवारी मिळाली की बहुतांश मुलं मुली डीएडकडे जायचे .त्या काळात डीएडला चांगला भाव होता. डीएड झालं की हमखास नोकरी मिळत होती .वर्षाताईंचे तसेच झाले .बारावीला चांगले मार्क्स पडले .आई-वडिलांनी डीएडला पाठवलं. डीएड झालं आणि लगेच नोकरी मिळाली .साधारण त्या काळात अध्यापक असलेल्या मुलगा अध्यापिका असलेली मुलगी सहचारिणी म्हणून निवडायचा. त्याला कारण असे होते की दोघांनाही जर अध्यापकाची नोकरी असली तर दोघांनाही चांगला पगार मिळेल. शिवाय एकच व्यवसायात असल्यामुळे दोघांनाही जाणे येणे पण सोयीचे होते. वर्षाताईंचे तसेच झाले. त्यांचे यजमान कनिष्ठ महाविद्यालयमध्ये प्राध्यापक होते. वर्षाताईचा विवाह झाला.पुढे कन्या झाली .हे सर्व सुरू असताना वर्षाताईंच्या एक लक्षात आले की माझी शाळा तपासायला जो अधिकारी वर्ग येतो .मी तर त्यांच्या एवढीच हुशार आहे .एकाद्या प्रशिक्षणाला जातो. मला शिकवायला येणारे तज्ञ मार्गदर्शक आणि मी यामध्ये फारसा फरक नाहीये.शिवाय अनेक वेळा प्रशिक्षण काळात वरिष्ठ अधिकारी वर्षाताईंनाच प्रशिक्षण द्यावयास सांगायचे. वर्षाताईंनी ते हरले .त्यांना त्यांच्या ठिकाणचे कौशल्य लक्षात आले .आणि त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे ठरवले. खरं म्हणजे ही तारेवरची कसरत होती .नोकरीचे गाव ग्रामीण भागात .अमरावती पासून 60 – 62 किलोमीटर अंतरावर. यजमान नोकरीला. लहान मुलगी. सासू सासरे .हे सर्व सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे म्हणज धनुष्यबाण पेलण्यासारखेच कठीण काम होते .पण वर्षाताई जिद्दीला पेटल्या .अभ्यासाला सुरुवात केली. तो काळ असा होता की त्या काळामध्ये स्पर्धा परीक्षांचा सुकाळ झालेला नव्हता .गल्लीबोळात स्पर्धा परीक्षांचे क्लास निघालेले नव्हते. अगदी अमरावती शहरात देखील नाही .त्यात तर वर्षाताई दर्यापूर सारख्या तालुक्याच्या गावाला राहत होत्या. जिल्हा परिषद म्हटलं म्हणजे पाच वाजेपर्यंत शाळा .शाळा संपल्यानंतर बस स्टॅन्डवर यायचं. एसटी बसची वाट पाहायची आणि मिळेल त्या बसने गावाला परत यायचं .शिवाय कुटुंबात सुनबाई म्हटल्यानंतर काही जबाबदाऱ्या असतातच आणि ते पार पाडणे आवश्यकही असते .त्यातही लहान मुलगी. तिलाही सांभाळणे .तिच्याशी बोलणे गरजेचे होते .हे सगळं करून त्यांनी दर्यापूरला असणारे आमचे स्पर्धा परीक्षेतील तज्ञ मित्र श्री गजानन कोरे यांची भेट घेतली. शाळेतून आल्यानंतर ती त्यांच्या क्लासला जाऊ लागली. पुस्तके वाचू लागली .समविचारी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आपल्या अभ्यासामध्ये भर टाकायला लागल्या. जिल्हा परिषदमध्ये शिकविण्याचा तसेच वेग वेगळे प्रशिक्षण करण्याचा त्यात प्रशिक्षक म्हणून इतरांना शिकविण्याचा वर्षाताईंना जो अनुभव आलेला होता तो त्यांच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या कामात आला. त्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवित होत्या तोच अभ्यास स्पर्धा परीक्षेलाही होता. मुलांना शिकविता शिकविता वर्षाताईंचाही अभ्यास होत होता. आणि प्रशिक्षणाला जाताना प्रशिक्षणार्थी म्हणून व काही ठिकाणी प्रशिक्षक म्हणून त्यांनी जे काही सामान्य ज्ञान सादरीकरणाचे कौशल्य आत्मसात केले ते त्यांना स्पर्धा परीक्षेच्या कामास आले आणि त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या .आज अमरावती शहरामध्ये वर्षाताईं शासकीय सेवेत कार्यरत आहेत. तीन वर्ष त्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्या मूळच्या सांख्यिकी संचलनालयामध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होत्या. आपली जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून असलेली कार्यकिर्द यशस्वी करून त्या त्यांच्या विभागात परत रुजू झाल्या. वर्षाताईंचे अधिकारी होणे हे आजच्या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे .नोकरी सांभाळणे सासू-सासर्‍यांना यजमानांना व लहान मुलीला सांभाळणे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून त्यामध्ये यश प्राप्त करणे. हे मोठे जिकडीचे काम होते. पण वर्षाताईंनी या सर्वांवर मात करून राजपत्रित अधिकारी होण्याचा जो संकल्प सोडला होता तो पूर्णत्वास नेला .अधिकारी झाल्यावर आम्ही त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांना आमंत्रित केले. त्यांचे अनुभव नवीन पिढीला ऐकवण्यासाठी त्यांना श्री संत गाडगेबाबा व्याख्यानमाला मिशन आयएएसची राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरं तसेच इतरत्र आम्ही आमंत्रित करीत गेलो. मागे एकदा काही मुलांचा मॉक इंटरव्यू घ्यायचा होता. तेव्हा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गणेश पाटील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डाँ. श्री के एम कुलकर्णी यांच्याबरोबर सौ. वर्षाताईंनाही त्या मुलाखतीच्या समितीमध्ये सहभागी करून घेऊन येणाऱ्या मुलांच्या मुलाखती घेण्याची विनंती केली. जी मुलगी आमच्याकडे माँक इंटरव्यूची तयारी करण्यासाठी आली होती .आज तीच मुलगी मॉक इंटरव्यू घेण्यासाठी बसलेली होती .जागतिक महिला दिन आज सर्वत्र साजरा होत आहे .अशावेळी अशा महिला अधिकाऱ्यांचा परिचय समाजाला व्हावा व समाजाने विशेषतः तरुणांनी व तरुणींनी या अधिकाऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तन-मन-धनाने स्वतःला झोकून देऊन समर्पण भावनेने स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे अशी अपेक्षा ठेवण्यासाठी वर्षाताईंचा हा जीवन प्रवास आम्ही तुमच्यासमोर ठेवलेला आहे .वर्षाताई आजही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर होत्या .आहेत आणि राहातीलही. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा.

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प महाराष्ट्र
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *