Hurry Up Now The Deal is Here!

आज प्रशासनात राहून लोकाभिमुख कार्य करून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी राहून विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करणे हे सोपे काम निश्चितच नाही. पण काही सनदी अधिकारी असे असतात की जे तन-मन-धनाने शासकीय सेवा करीत असतात. लोकाभिमुख व लोकोपयोगी कार्य हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. अशाच एका अधिकाऱ्याचे नाव आहे श्री दिलीप स्वामी. त्यांना यावर्षीचा आधुनिक संकल्पना निर्माण केल्याबद्दल व त्या यशस्वीपणे संभाजीनगर मध्ये राबवल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र दिनाला गौरविण्यात येणार आहे. तसे पत्र संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी त्यांना नुकतेच रवाना केले आहे .

कल्पक जिल्हाधिकारी

संभाजीनगर सारख्या शहराचे जिल्हाधिकारी पद सांभाळणे म्हणजे अवघड काम. पण ते श्री दिलीप स्वामी साहेबांनी अतिशय कौशल्याने हाताळले. त्यांच्या डोक्यात नेहमी नवीन नवीन कल्पना येतात आणि त्या त्यांनी त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेत येणाऱ्या इतर विभागामध्ये प्रामाणिकपणे सातत्याने व सचोटीने राबविल्या म्हणून शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून पहिल्या क्रमांकाचे आधुनिक संकल्पना पारितोषिक देऊन गौरविण्याचे ठरविले आहे. सनदी अधिकारी म्हणून कार्यरत करत असताना सतत लोकाभिमुख राहावे लागते. लोकाभिमुख कामे करावी लागतात. म्हणजे त्यामुळे जनता दरबार नेहमी अशा अधिकाऱ्यांचे पाठीशी उभे राहत असतो. संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांना ते कौशल्य अवगत झाले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

श्री दिलीप स्वामी जिथे जिथे जातात तिथे तिथे अभिनव आधुनिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात त्यांच्या हातखंडा आहे. संभाजीनगरला जिल्हाधिकारी म्हणून येण्यापूर्वी ते सोलापूरला जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी जिल्हा परिषदेचा चेहरा मोहराच बदलून टाकला .तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांचा काया पालट केला .प्रत्येक शिक्षकाला सतर्क केले प्रशिक्षित केले आणि लोकाभिमुख केले. या उपक्रमांमध्ये पारितोषिक वितरण करण्यासाठी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार सोलापूरला आले आणि त्यांनी दिलीप स्वामी साहेबांचा लेखाजोखा पाहिला .तेव्हा सोलापूर जिल्हा परिषद हा जो उपक्रम राबवित आहे तो संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये राबविण्यात यावा असा अनुकूल अभिप्राय दिला. एका राज्याचे उपमुख्यमंत्री गावात येतात काय ? स्वामी साहेबांचे काम पाहतात काय आणि स्वामी साहेबांना त्यांनी राबविलेला उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचे आश्वासन देतात काय ही खरोखरच गौरवाची गोष्ट आहे .

शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातल्या त्यात यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा उच्चांक गाठलेला जिल्हा आहे .या जिल्ह्यांमध्ये पुसद हया श्री वसंतराव नाईक व श्री सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री राहिलेल्या मोठ्या व्यक्तींच्या गावात त्यांची उपविभागीय अधिकारी म्हणून जेव्हा निवड झाली तेव्हा त्यांनी पहिल्या क्रमांकावर शेतकरी निवडला. शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटले .त्यांचे मेळावे घेतले. प्रसंगी त्यांच्या घरीही गेले. त्यांना सकारात्मक केले आणि अनुकूल वातावरण तयार केले .त्यामुळे त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या आणि महाराष्ट्र शासनाने प्रसार माध्यमाने सनदी अधिकाऱ्यांनी तसेच मंत्रालयातील मंत्र्यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत केले. एवढेच नाही तर महाराष्ट्राचे आयडॉल या गौरव ग्रंथामध्ये त्यांच्या कार्याची नोंद घेतली गेली l. जितने वाले कोई अलग काम नही करते वे हर काम अलग ढंग से करते है . असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल.

जिल्हाधिकारी चक्क बंडित

एक उपक्रमशील लोकाभिमुख आणि सदैव हसरा चेहरा असणारा जिल्हाधिकारी म्हणून श्री दिलीप स्वामी साहेब यांचा नावलौकिक आहे. प्रसंगी चार चाकी गाडी प्रसंगी मोटरसायकल आणि परवा तर त्यांनी कमालच केली. ज्या बोरगाव गावात त्यांना जायचे होते. त्या गावाला जाण्यासाठी रस्ता चांगला नव्हता . पांदन रस्ता होता.चार चाकी गाडीही जाऊ शकत नव्हती .अशा वेळेस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून चक्क बंडीने प्रवास केला. बंडी ने प्रवास करून त्या गावाला पोहोचलेला सदीप सनदी अधिकाऱ्यांच्या यादीतील हा पहिला सनदी अधिकारी असावा. त्या बोरगाव गावकऱ्यांना किती आनंद झाला असेल त्यांचे प्रश्न सोडवायला विलंब लागेल पण आपले प्रश्न पाहण्यासाठी आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी बंडी मधून येतात ही बाब त्या बोरगाव गावातील लोक कधीही विसरू शकणार नाहीत. संभाजीनगर जिल्ह्यातील बोरगावचे रहिवासी हा प्रसंग आपल्या हृदय पटलावर करून ठेवल्याशिवाय राहणार नाहीत .

जिथे जातो तेथे माझा सांगाती

श्री दिलीप स्वामी यांच्या प्रशासकीय जीवनाची सुरुवात उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावती येथे झाली. इथेच त्यांचा माझा परिचय झाला व तो आजही कायम आहे .साहेब बदली होऊन बुलढाणा नांदेड सोलापूर पुसद अशा वेगवेगळ्या गावात गेले. त्यांचा बराचसा कालखंड हा अमरावतीमध्ये गेला आणि आता तर ते चक्क अमरावतीकर म्हणून ओळखल्या जाऊ लागले. अमरावतीचा अंबा फेस्टिवल असो की कुठलाही कार्यक्रम असो दिलीप स्वामी साहेब त्या कार्यक्रमाला येतात .अमरावती येथील मित्रांची संस्थांची प्रशासकीय संस्थांची त्यांची घट्ट नाळ जुळली आहे. ते इतके तन मन धनाने काम करतात की हा माणूस आमच्याच गावचाच आहे आमच्याच नात्यातला आहे आमच्या सुखदुःखांना समजून घेणारा आहे असा आत्मविश्वास लोकांमध्ये तयार होतो आणि त्यांच्याशी जवळी पण साधल्या जाते .अमरावतीमध्ये आज स्वामी साहेबांचे अनेक मित्र त्यांचे नातेवाईक झाले आहेत. आमचे मित्र श्री ओम प्रकाश चर्जन हे त्यांच्या सतत संपर्कात असतात. त्यांचे अमरावतीचे गेट-टुगेदर ते घडवून आणतात .

रस्ता बंद पण स्वामी पोहोचले

साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. साहेब तेव्हा उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावतीला कार्यरत होते. तेव्हा शेतकरी संघटना अतिशय प्रबळ होती. साहेबांचा एक कार्यक्रम आम्ही अमरावती जिल्ह्याची अंजनगाव सुरजी येथे ठेवला होता .कार्यक्रम विदर्भस्तरीय होता. साहेबांच्या हस्ते उद्घाटन होते. पण नेमके ज्यावेळेस उद्घाटन होते त्याच दिवशी शेतकरी संघटनेने बंद पुकारला. रस्ता रोको आंदोलन पुकारले .साहेब ज्या रस्त्याने येणार होते त्या आसेगाव पूर्णाला नदी लागत होती आणि नदीच्या पुलावरील दोन्ही टोकाला शेतकरी संघटनेचे नेते रस्ता अडवून होते. मी साहेबांना फोन केला. साहेब म्हणाले. मी बरोबर वेळेवर पोहोचतो .मी म्हटलं साहेब तुम्ही कसे पोहोचणार .रस्ता तर दोन्ही बाजूने बंद आहे. ते म्हणाले. मी पूर्ण नियोजन केले आहे. मी कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी पोहोचतो आणि खरोखरच साहेब कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी अंजनगावच्या विदर्भ संत साहित्य संमेलनाला पोहोचले. या ठिकाणी त्यांनी आपली कल्पकता लढवली . ते अमरावती ते आसेगाव पूर्णा या गावा पर्यंत शासकीय वाहनाने आले. शासकीय वाहन तिथं पार्क केले आणि तिथून पुलाच्या पलीकडे चालत गेले. पुलाच्या पलीकडे त्यांनी दुसरे वाहन बोलावून ठेवले होते आणि त्या दुसऱ्या वाहनात बसून ते अंजनगाव सुर्जीच्या कार्यक्रमाला आले. त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावीच लागेल . असा हा कल्पक अधिकारी आहे.

आधुनिक संकल्पना

श्री दिलीप स्वामी साहेब संभाजीनगरला रुजू झाल्यापासून विविध उपक्रम ते सातत्याने राबवित आहेत .त्यांच्याबरोबर पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय हे लोकाभिमुख झाले आहे. सक्रिय झालेले आहे. असेच प्रयोग यापूर्वी सनदी अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी संभाजीनगर येथे राबविले आहेत. दिलीप स्वामी साहेब हे श्री रवींद्र जाधव डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या तालमीत तयार झालेले .अतिशय कल्पकता त्यांच्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या संकल्पना नेहमी त्यांच्या डोक्यात येतात आणि संभाजीनगरला रुजू झाल्यापासून त्यांनी त्या संकल्पना प्रत्यक्ष संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राबवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. प्रसार माध्यमांनी लोकांनी त्यांच्या या लोकाभिमुख उपक्रमाची दखल घेतली आणि ती महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचली. महाराष्ट्र शासनाने देखील या तत्पर तेजस्वी व तपस्वी अधिकाऱ्याचा महाराष्ट्र दिनाला गौरव करण्याचे ठरविले आहे आणि म्हणून त्यांना विभागातील आधुनिक संकल्पना राबवल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घोषित करून महाराष्ट्र शासनाने या तत्पर आणि आधुनिक संकल्पना आपल्या कार्यालयात राबवणाऱ्या अधिकाऱ्याचा महाराष्ट्र दिनी गौरव करण्याचे ठरविले आहे. त्यांना प्राप्त झालेल्या या गौरवाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *