Hurry Up Now The Deal is Here!

श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या नंतर स्पर्धा परीक्षेच्या जगतात चर्चेत दुसरे नाव आहे ते श्री भरत आंधळे यांचे. भरत आंधळे आज आयकर खात्यात सनदी अधिकारी आहेत .अतिशय विपरीत परिस्थितीत या माणसाने धाडसाने स्पर्धा परीक्षा यश संपादन केले आहे. श्री भरत आंधळे स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागले. पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेला बसले . अयशस्वी झाले .पण त्यांनी कुठेतरी ऐकले होते. अपयश यशाची पहिली पायरी असते. भारत आंधळे परत स्पर्धा परीक्षेला बसले .परत नापास झाले .हा सिलसिला असाच सुरू राहिला. भारत आंधळे परीक्षेला बसत गेले. नापास होत राहिले. आपल्या गरुडझेप या आत्मचरित्रात श्री भारत आंधळे म्हणतात .मी एक नाही. दोन नाही. स्पर्धा परीक्षेचा अख्खा जिनाच पार केला व स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालो.
घरची जेमतेम परिस्थिती . आई वडील फारसे शिकलेले नाहीत. ग्रामीण वातावरण. पण ते सतत प्रयत्न करीत राहिले .लहान सहान परीक्षा पासून प्रारंभ केला .यश येत गेले. ते एकेक पाऊल पुढे टाकत गेले आणि आज आयकर विभागात ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत .इंग्रजी चांगली नाही. आपण हुशार नाही म्हणून ते घाबरले नाहीत. त्यावर त्यांनी एक उपाय काढला. ते हुशार मुलांच्या सहवासात राहू लागले. म्हणतात ना दगड पाण्यात पडला तर तो ओला होऊन बाहेर पडतो. पाण्याचा काही अंश दगडाला लागतो .त्याप्रमाणे भरत आंधळेचे झाले .हुशार विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे व त्यांनी सहकार्य केल्यामुळे भरतला यश मिळत गेले व आज ते उच्चपदस्थ अधिकारी आहेत.
गरुड झेप या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी ह्या आपल्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत .स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर पुणे येथे जावे लागते. असे त्यांनी वारंवार ऐकले होते. त्यांनाही वाटले आपणही पुण्याला जावे. त्याप्रमाणे एक दिवस दृढ निश्चय करून ते पुण्याला निघाले .जवळ पुरेसे पैसे नाहीत. पुण्यात कोणी ओळखीचे नाही. क्लास लावायची सोय नाही .पण जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे असे म्हणतात ना त्याच भावनेने कपडे कागदपत्र यांची सुटकेच घेऊन भारत आंधळे पुणे स्टेशनवर उतरले. त्यांना असे वाटले की पुण्याला आपण पार्ट टाइम जॉब करू. त्यानंतर पैसे मिळतील. पोटापाण्याची सोय होईल आणि स्पर्धा परीक्षेची पुण्यात राहून तयारी होईल .पुण्याचे वातावरण चांगले असल्यामुळे येथील स्पर्धा परीक्षेच्या वातावरणाचा लाभ होईल .पण पुण्याच्या काही अंदाज नसलेला हा भारत आंधळे नावाचा मुलगा जेव्हा पुण्याला आला. तर पहिल्या दिवशी तर निराशा त्याच्या पदरी पडली. दिवसभर फिरूनही जॉब मिळाला नाही .काही ठिकाणी पार्ट टाइम नोकरी मिळत होती. पण ते लोक ओळख मागत होते .दुसरा मुलगा असता तर आल्या पावली परत गेला असता. पण भारतने तसे केले नाही .
दिवसभर फिरूनही साधा पार्ट टाइम जॉब मिळत नाही हे पाहून भारतने ठरवले की उद्या परत प्रयत्न करू .पण राहायचे कुठे .हॉटेलचे पेमेंट करायला तर पैसे नाहीत. आणलेले पैसे जर हॉटेलमध्ये राहायला खर्च केले तर खाण्याचे वांधे. हॉटेलचे पेमेंट करायला पैसे नाहीत .शेवटी भारत आंधळे यांनी रेल्वे स्टेशनवर झोपण्याचा निर्णय घेतला. झोपू तर रेल्वे स्टेशनवर. पण सोबत असलेल्या बॅगचे काय ? ही सुटकेस चोरीला गेली तर काय ? करायचे .आले की नाही पंचाईत
व्हेअर देअर इज विल देअर इज वे असे म्हणतात ना. भारताच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला. ठेवण्याची सोय झाली .पण त्यासाठी भरतची कल्पकता कामी आली .तो सुटकेस घेऊन एका लॉन्ड्री त गेला आणि लॉन्ड्रीवाल्याला म्हणाला. काका कपडे प्रेस करून पाहिजे होते . त्याने भारतकडे पाहिले व विचारले कुठून आलास ? भारत म्हणाला सिन्नर नाशिक जिल्हा. लॉन्ड्रीवाला म्हणाला हे पुणे आहे पुणे. ताबडतोब कपडे प्रेस करून मिळणार नाहीत. थोडा वेळ लागेल. भरत म्हणाला काही हरकत नाही. त्यांनी सुटकेस उघडली. तीन-चार कपडे लॉन्ड्री वाल्याला दिले आणि त्याला हळूच म्हटले काका ही सुटकेस इथे थोड्या वेळासाठी ठेवली तर चालेल का. होकार देताच भारतने आपली सुटकेस ठेवली आणि तो रेल्वे स्टेशनवर झोपायला चालला गेला.
रेल्वे स्टेशनवर झोपेमध्ये अडचणी यायला लागल्या. पोलीस लोक मध्येच उठून चौकशी करत. दोन-तीन दिवस भारत पुण्यात फिरला. कुठेतरी खाजगी नोकरी मिळते का याचा प्रयत्न करू लागला. सायंकाळ झाली की त्याची पावले रेल्वे स्टेशनकडे वळायची. रेल्वे स्टेशन वरील नळाचे पाणी पिऊन त्याने दिवस काढले आणि दोन-तीन दिवसानंतर त्याला पार्ट टाइम जॉब मिळाला. त्या दरम्यान त्याने पुणे विद्यापीठात आपल्या गावाकडच्या मुलांची संपर्क साधला. विद्यापीठात राहण्याची सोय झाली. पार्ट टाइम जॉब मिळाला. भारत लॉन्ड्री वाल्याकडे गेला .त्याची माफी मागितली व सुटकेस घेऊन आला. आणि आज केंद्रीय लोकसेवा आयोगाचची परीक्षा पास होऊन भारत आय आर एस झाला आहे .

विश्वास नांगरे पाटील यांच्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या जगतात प्रेरणादायी भाषण देणारा वक्ता म्हणून श्री भारत आंधळे यांचे नाव आहे. अतिशय चांगले व्याख्यान देणारा मुलांना खेळून ठेवणारा आणि सत्य तेच मांडणारा अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आम्हाला अमरावतीला श्री भारत आंधळे यांचे व्याख्यान ठेवायचे होते. तेव्हा श्री भारत आंधळे हे नाशिकला कार्यरत होते. मी व सौ विद्या आम्ही दोघं नाशिकला त्यांच्या कार्यालयात पोहोचलो. त्यांना अमरावतीचे निमंत्रण दिले. तत्कालीनआमदार व विद्यमान खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी त्यांच्या मतदारसंघात मोर्शी येथे श्री भारत आंधळे यांची स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित केली होती .ते निमंत्रण घेऊन आम्ही पोहोचलो होतो. भारत आंधळ्यांनी तात्काळ होकार भरला.
कार्यक्रमाची भरपूर जाहिरात झाली होती. त्या काळात भारत आंधळ्यांचे नाव खूप चर्चेत होते. त्या दिवशी कार्यक्रम त्या दिवशी श्री भारत आंधळे मुंबई अमरावती या गाडीने अमरावतीला येणार होते त्याप्रमाणे आम्ही अमरावती रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. सोबत आमदार डा अनिल बोंडे साहेब होते. आम्ही एसी डब्यासमोर उभे होतो. पूर्ण गाडी खाली झाली. पण भारत सर दिसले नाहीत. माझ्या पोटात एकदम धस झाले. आता कसे करायचे. मी भारत आंधळे यांना फोन लावला. ते म्हणाले अहो मी स्लीपर क्लास मध्ये आहे. माझे एसीचे रिझर्वेशन कन्फर्म झाले नाही. त्यामुळे मी स्लीपर क्लासने आलो आहे. एवढा मोठा सनदी अधिकारी साध्या स्लीपर क्लासने नाशिक ते अमरावती हा प्रवास करतो हे खरोखरच नोंद करण्यासारखे आहे
मोर्शीच्या कार्यक्रमाला साधारणपणे दहा हजार लोक होते .आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी भव्य सभा मंडप टाकला होता. जिल्हाधिकारी श्री राहुल रंजन महिवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. आमच्या कार्यक्रम सकाळी दहा वाजताचा होता. भारत आंधळे यांनी दुपारी तीन वाजताची वेळ ही अमरावतीच्या बहुतेक नितीन पवित्रकार यांना दिली होती. त्यांनी अमरावतीला विदर्भ महाविद्यालय परिसरातील संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहात त्यांचे व्याख्यान ठेवले होते. मोर्शीचा कार्यक्रम विलंबाने सुरू झाला. भारत आंधळे यांच्या आधी बाकीचे लोकही बोलले. कार्यक्रम संपला तेव्हा दोन वाजले होते. आमदार बोंडे यांनी विश्रामगृहावर त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. आम्ही सर्वांनी त्यांना आग्रह केला. पण ते म्हणाले मी जेवण करीत बसलो तर माझा तीन वाजता चा अमरावतीचा कार्यक्रम होणार नाही. मुले माझी वाट पाहत असतील. ते गाडीत बसले .मी पण त्यांच्या बाजूला बसलो. आमची गाडी अमरावतीच्या दिशेने निघाली. मी वाटेत भरत सरांना म्हटले सर काहीतरी खायला घेतो .पण ते म्हणाले .गाडी अजिबात थांबू नका .सरळ कार्यक्रमाच्या ठिकाणी घ्या. मुले माझी वाट पाहत आहेत.
आम्ही अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालय परिसरात पोहोचलो. सभागृह तुडुंब भरले होते. सभागृहाच्या बाहेरी प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीतून वाट काढत आम्ही स्टेजवर पोहोचलो. भारत आंधळे यांचे सर्वांनी उत्स्फूर्त स्वागत केले. भारत आंधळे यांनी भाषण सुरू केले. तो काळ असा होता की स्पर्धा परीक्षेच्या जगतात भारत आंधळचे नाव वरच्या क्रमांकावर होते. विश्वास नागरे पाटलांना पोलीस खात्यात असल्यामुळे भाषणाला येणे जमत नव्हते. पण भारत आंधळे जास्तीत जास्त कार्यक्रम करत होते. कार्यक्रम संपला आणि आम्ही भारत आंधळना एका रूममध्ये अक्षरशः कोंडले. त्यांना भेटायला इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी स्टेजवर आले की त्यांना आवरणे कठीण. आम्ही पोलिसांना बोलावले आणि त्या पूर्ण गर्दीतून त्यांना बाहेर काढले.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भारत आंधळे यांना भेटावयास बोलावले होते. त्याप्रमाणे आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे गेलो .तोपर्यंत अमरावती मुंबई गाडीची वेळ झाली होती .भारत आंधळे यांनी या पूर्ण आठ तासात काहीही खाल्ले नव्हते .पण आमची एक विद्यार्थिनी होती. ती आमच्या या प्रवासात सोबत होती. तिने घरी जाऊन त्यांच्यासाठी डबा करून आणला आणि गाडीत बसताना त्यांच्या हाती दिला.

भारत आंधळना खूप लोकांना भेटायचे होते. काही कल्पक तरुणांनी भारत आंधळे कोन्या गाडीने जाणार आहेत याची माहिती काढली व त्या गाडीचे अमरावती अकोलापर्यंतचे तिकीट काढले. चालत्या गाडीतही भारत आंधळ्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं.
भारत आंधळे हा तळमळीचा सनदी अधिकारी आहे. एवढा मोठा अधिकारी असताना स्लीपर क्लासने येणे. दिवसभर जेवण न करणे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे . हया त्यांनी ज्या विपरीत परिस्थितीत दिवस काढले त्याची जाणीव असल्याचे मला जाणवले. भारत आंधळे यांनी 1000 पुस्तके सोबत आणली होती .तेव्हा गरुडझेपची किंमत शंभर रुपये होती. भारत सरांनी मुलांना सूट म्हणून ती पुस्तके 70 रुपयांमध्ये देण्याचे ठरविले. कार्यक्रमाला इतकी गर्दी होती की त्यातले एकही पुस्तक शिल्लक उरले नाही. एका कार्यक्रमांमध्ये हजार पुस्तके विकले जाण्याचा हा एक विक्रम होता. आणि तो विक्रम करणाऱ्या भारत आंधळे हा जमिनीवर चालणारा अधिकारी आज शासनाच्या आयकर विभागात ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये झुंज देऊन अधिकारी झालेल्या या सनदी अधिकाऱ्याला आमच्या मानाचा मुजरा .

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *