Hurry Up Now The Deal is Here!

भारताचे पहिले कृषिमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची 10 एप्रिल रोजी पुण्यतिथी त्यानिमित्त हा लेख

आज अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा व्याप संपूर्ण विदर्भात पसरलेला आहे. आज या संस्थेमध्ये वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय महाविद्यालये शाळा व इतर शाखांचा विस्तार झालेला आहे. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली नसती तर कालची आणि आजची पिढी घडू शकली नसती. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे एवढे उपकार या विदर्भावर आहेत. भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री म्हणून केंद्र सरकारमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे .त्यांनी आयोजित केलेले जागतिक कृषी प्रदर्शन हे इतिहासात मैंलाचा दगड ठरले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांनाही शिक्षणाच्या गंगेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी लोक विद्यापीठाची स्थापना केली आणि त्यासाठी सरळ राष्ट्रपतींनाच अमरावतीला बोलावले. वीर उत्तमराव मोहिते तसेच श्री सुदाम सावरकर यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची सविस्तर चरित्र लिहिलेली आहेत .ती आज उपलब्ध आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होते. त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे यात शंकाच नाही. पण हा माणूस दृष्टी असलेला होता. आजच्या आधुनिक काळातही ही दृष्टी लोकांजवळ दिसून येत नाही. पण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी त्या काळात जी दृष्टी ठेवून काम केले त्यामुळे त्यांच्या समकालीन व नंतरच्या पिढ्या खऱ्या अर्थाने भक्कमपणे आपल्या पायावर उभ्या राहिल्या. पंजाबरावांचे शैक्षणिक कृषी विषयक कार्य सर्वांना माहीत आहेच .पण एक माणूस म्हणून त्यांनी केलेले कार्य देखील शब्दातीत आहे. मी त्यांची एक आठवण वाचली आहे .ते दिल्लीवरून नागपूरला आले आणि नागपूरहून कारने अमरावतीला निघाले. जवळपास मध्यरात्र झाली होती .अमरावतीला येता येता तीन वाजणार होते. ते चालकाला म्हणाले गाडी रस्त्याच्या बाजूला घे. चालकाने गाडी बाजूला घेतली. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख चालकाला म्हणाले इतक्या रात्री घरी जाणे योग्य नाही. सर्वजण झोपलेले असतील. आपण असं करू. थोडा वेळ गाडीमध्येच झोप घेऊ. आणि नंतर मग अमरावतीला सकाळी सकाळी जाऊ. चालकाने ते ऐकले आणि तो थक्कच झाला… भाऊसाहेब चक्क गाडीमध्ये झोपले. तेव्हाच्या गाड्या आजच्यासारख्या आधुनिक व वातानुकूलित नव्हत्या. पण आपल्यामुळे आपल्या घरच्या लोकांना नोकर चाकार्‍यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी गाडीमध्ये झोपणे पसंत केले. आजची अमरावतीची जी शिवाजी मराठा हायस्कूल ही शाळा शिवाजीनगर परिसरात आहे .तिची गोष्ट देखील लिहिण्यासारखी आहे. भाऊसाहेबांनी सुरुवातीला तिथे तट्ट्याची शाळा उभारली. त्या काळात तटटयाची शाळा उभारून पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणाची दारे सर्व सामान्य लोकांसाठी मोकळी करून दिली. हैदराबादच्या निजामाकडे जाऊन श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीसाठी भाऊसाहेबांनी निधी आणला आणि आज या महाविद्यालयातून कितीतरी तरुण नव्हे तरुणांच्या पिढीच्या पिढी हया तयार झालेल्या आहेत. भाऊ साहेबांनी लावलेल्या या अंकुराचा आज श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या रूपाने वटवृक्ष तयार झालेला आहे. अमरावती विभागातील एका मोठ्या देणगीदाराने श्री शिवाजी शिक्षण संस्थेला मोठी देणगी दिली होती. पण देणगीचे पैसे काही मिळत नव्हते. भाऊसाहेबांच्या चकरा सुरूच होत्या.एक वेळ भाऊ साहेबांनी पक्का चंग बांधला आणि ते त्या जमीनदाराच्या घरीच बसूनच राहिले. नोकरांनी सांगितले .साहेब घरी नाहीत. भाऊसाहेब म्हणाले .ते येईपर्यंत मी थांबतो. शेवटी जमीनदार नरमले आणि त्यांनी भाऊ साहेबांना देऊ केलेली रक्कम भाऊ साहेबांच्या हवाली केली. एक वेळ भाऊसाहेब पापळला जायला निघाले .भाऊ साहेबांच्या गाडीसमोर एक बैलगाडी चालत होती. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या ड्रायव्हरने हॉर्न दिला .भाऊसाहेबांनी गाडीतून पाहिले .बैलगाडी चालवणारा त्यांना ओळखीचा वाटला. त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितले. पावसात गाडीतून उतरले. बैलगाडी थांबली होती .बैलगाडी चालक बैलगाडी बाजूला घेत होता व गाडीला रस्ता करून देत होता. भाऊसाहेब त्या बैलगाडी चालकाकडे गेले .त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले मामा मला ओळखले नाही का.? त्या पापड गावच्या नागरिकाला गहिवरून आले .एवढा मोठा माणूस. आपल्यासाठी गाडी थांबवतो .आपल्या बैलगाडीजवळ येतो आणि आपल्याला मामा म्हणून हाक घेतो. त्याला त्याचे जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले. भाऊसाहेबांवर जो चल चित्रपट मी पाहिला. त्यामध्ये एक दृश्य मला भारावून गेले. कृषी राज्यमंत्री असलेले भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख गावात आलेले असतात. त्यांचा जयजयकार सुरू असतो .श्री संत गाडगेबाबा येतात आणि पंजाबरावांच्या पायावर लोटांगण घालतात . श्री संत गाडगेबाबांनी पंजाबरावांची ही दूरदृष्टी ओळखली होती. त्यांनी शिक्षणाची जी गंगा विदर्भात आणली तिला वंदन करण्यासाठी श्री संत गाडगेबाबा पाया पडून डॉक्टर पंजाबराव यांना आशीर्वाद देतात.अमरावती जिल्ह्यातील वलगाव जवळील रेवसा येथील यात्रेमध्ये जेव्हा गाडगेबाबा येतात .जमिनीवर बसतात. तेव्हा साहेब पंजाबराव देशमुख देखील गाडगे महाराजांबरोबर चक्क नदी काठावरील रेतीमध्ये गाडगेबाबांच्या मांडीला मांडी लावून बसतात.किती ही विनायशीलता .भाऊ साहेबांना मुंबईला जायचे असले तर ते हावडा मेलने जायचे.. घरून निघाले की ते आठवणीने दैनिक हिंदुस्थानमध्ये जायचे. दैनिक हिंदुस्थानचे संपादक श्री बाळासाहेब मराठे यांच्याशी गप्पागोष्टी चहापान झाल्यानंतरच ते हावडा मेलकडे निघायचे. एक वेळ असेच ते दैनिक हिंदुस्थानमध्ये आले .गप्पागोष्टीच्या ओघात बाळासाहेबांनी सांगितले दैनिक हिंदुस्थान मध्ये टेलीप्रिंटर नाही. कारण अमरावतीला तार ऑफिस नाही. तार ऑफिस नसल्यामुळे टेलिप्रिंटरची व्यवस्था करता येत नाही. लोकांपर्यंत बातमी पोहोचण्यासाठी टेलिप्रिंटरची खरच गरज आहे. पण जोपर्यंत तार ऑफिस होणार नाही तोपर्यंत टेलिप्रिंटर आम्हाला घेता येणार नाही. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी बाळासाहेबांचे म्हणणे ऐकून घेतले. काहीच भाष्य केले नाही. आधी करायचे मग सांगायचे हा भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा स्वभाव होता.मग भाऊ साहेबांनी मनापासून ठरवले. दैनिक हिंदुस्थान प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचत आहे .यांची टेलीप्रिंटर ही निकड आहे .आपण लोकप्रतिनिधी आहोत .आपण जर या कामात पुढाकार घेतला तर लोकांपर्यंत ताज्या बातम्या जातील. हिंदुस्थानची सोय होईल आणि अमरावतीला तार ऑफिस पण सुरू होईल. भाऊसाहेबांनी मनावर घेतले आणि बाळासाहेबांना त्यांनी धक्का दिला .फक्त दोन दिवसांमध्ये अमरावतीला तार ऑफिस सुरू झाले. आणि तार ऑफिस सुरू झाल्याबरोबर दैनिक हिंदुस्थानीमध्ये टेलीप्रिंटर सुरू झाला .आज दैनिक हिंदुस्थानचा व्याप खूप वाढलेला आहे. बाळासाहेबांनंतर डॉक्टर अरुण मराठे यांनी समर्थपणे आपले काम सुरूच ठेवले .बाकीचे बंधू देखील मदतीला आले. डॉक्टर अरुण मराठे नंतर त्यांच्या नंतरच्या पिढीने आमचे तरुण मित्र श्री विलासराव मराठे व त्यांच्या परिवारातील इतरांनी हा वारसा त्याच तोलामोलांनी पुढे चालविला आहे .पण या सर्वांना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कोणताही गाजावाजा न घेता कोणतेही क्रेडिट न घेता अमरावतीला तार ऑफिस आणून दैनिक हिंदुस्थानला टेलीप्रिंटरची जी व्यवस्था करून दिली ती न विसरण्यासारखी आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी खूप काम करून ठेवलेले आहेत. खरं म्हणजे भाऊसाहेब हे सूर्य. आपण त्या सूर्य किरणाची एक किरण जर झालो तर भाऊसाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण केले असे होईल. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांची कविता आहे . गीतांजली या कवितासंग्रह मध्ये आहे.गीतांजलीला नोबेल पारितोषिक मिळाले आहे.त्या कवितेमध्ये ते असे म्हणतात सूर्यास्ताच्या वेळेस मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला. माझ्यानंतर माझें काम कोण करेल. कोणीच उत्तर दिले नाही .एक मिणमिणती पणती म्हणाली. भगवान मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. आपणास भाऊसाहेबांसारखे बहुमूल्य काम करणे अशक्य आहे. पण आपण एक पणती होऊन भाऊसाहेबांचे हे कार्य करू शकतो .प्रत्येकाने आपल्या हृदयातील पणती पेटवावी हीच खरी भाऊसाहेब डॉक्टर पंजाबरावांना आदरांजली ठरेल.

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *