Hurry Up!

Deal Of The Day..!

आत्मकथन-प्रोफेसरची डायरी
लेखक- डॉ.लक्ष्मण यादव
मराठी अनुवाद- चिन्मय पाटणकर
प्रकाशन-मधुश्री प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष- २०२४
एकूण पृष्ठ-१७२
मूल्य- रु.२५० )

डॉ. लक्ष्मण यादव हे अभ्यासक, बुद्धिजीवी आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. भारतीय समाजात संघर्ष करणाऱ्या लोकांची बाजू घेणाऱ्या प्रवाहांना एका मंचावर आणण्याचा ते प्रयत्न करतात. समाजवाद, आंबेडकरवाद, स्त्रीवाद आणि आदिवासींचा संघर्ष, सामाजिक न्याय हे त्यांच्याबाबतच्या मोठ्या लढ्याचे वेगवेगळे रंग आहेत. त्यांना अलाहाबाद विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त आहे. दिल्ली विद्यापीठातून ‘तुलसीदासविषयक टीका’ या विषयांवर त्यांनी विद्यावाचस्पती पदविसाठीचे संशोधन केलेले आहे. जवळपास दीड दशक डीयू(दिल्ली विद्यापीठा)च्या जाकीर हुसेन महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. ‘संत तुलसीदास’ यांच्यावरील त्यांचे एक पुस्तक प्रकाशित आहे.
त्यांच्या दीड दशकांच्या काहीशा संघर्षशील पर्वाचा वास्तववादी प्रवास त्यांनी आपले आत्मकथन ‘प्रोफेसरची डायरी’ मधून मांडला आहे. वयाच्या बेचाळीशीत प्रस्थापित व्यवस्था आणि उच्च शिक्षणक्षेत्र यांचा आलेला सूडबुद्धी व विषमतावादाचा अनुभव ते ‘प्रोफेसरची डायरी’ मधून मांडला आहे. शिक्षणक्षेत्रासारख्या पवित्र व जनकल्याणवादी क्षेत्राचे सांप्रतकाळातील हिडीस,भयकारी वास्तव त्यांनी जिवंत शब्दांकित केले आहे. विश्वविद्यालय असो वा अगदी ग्रामीण भागातील विविध कार्यालये तिथपर्यंत हे राजकारण आणि ‘स्लो पॉयझनिंग’ वाढताना दिसते आहे. अन्याय आणि शोषण यांची शिकार होणारे कितीतरी जीव असतात. पण सारेचजण त्यांना आलेले अनुभव मुखर करण्याची हिंमत, निर्भयता दाखवत नाहीत. कारण ते जगासमोर आणले म्हणजे ही व्यवस्था त्यांची वाट अजूनच काट्यांची करत जाते व त्यांना हयातभर संघर्षच करावा लागतो. त्यांचा वा त्यांच्या कारकिर्दीचाच बिनदिक्कतपणे ही दमनकरी व्यवस्था घास घेते हे वास्तव आहे. प्रस्थापित व्यवस्थेला स्वयंभू, बुद्धिमान व वरचढ लोक झेपत नसतात. हे लोक सरळमार्गी असूनही अनेकदा बळी ठरतात. हीच कहानी डॉ. डॉ.लक्ष्मण यादव आपल्याला सांगत आहेत.

‘प्रोफेसरची डायरी’ हे आत्मकथन म्हणजे ‘आजवर उच्चशिक्षणाची न सांगितलेली कहानी’ आहे. रोहित वेमुला आणि त्याच्यासारख्या अधुऱ्या राहून गेलेल्या असंख्य शक्यतांना डॉ.लक्ष्मण यादव यांनी हे आत्मकथन अर्पण केले आहे. ‘प्रोफेसरची डायरी’ या आत्मकथनामध्ये डॉ. लक्ष्मण यादव यांच्या आयुष्याचा आणि अनुभवांचा ऑगस्ट २०१० ते डिसेंबर २०२४ पर्यंतचा वास्तवदर्शी लेखाजोखा आहे. एकूण ५३ डायरीची पाने यात आपल्याला वाचायला मिळतात.‘प्रोफेसरची डायरी’ हे आत्मकथन म्हणजे आजमगडमधल्या एका साध्यासरळ, बुद्धिमान, संघर्षशील, विवेकवादी तरुणाची कथा आहे. पीएच.डी. बरोबरच ॲडव्हॉक प्राध्यापक पदासाठी दिल्ली विद्यापीठात प्रयत्न करणाऱ्या ह्या तरुणाला ‘ॲडव्हॉक’ हा शब्दच नवखा होता. वरिष्ठ असणाऱ्या रघुदा हे ॲडव्हॉकसंदर्भात लेखकाला माहिती देतात.
दिल्लीत दरवर्षी पावसाचा जून महिना ‘ॲडव्हॉक’ होण्याची शक्यता घेऊन येतो. दिल्ली विद्यापीठाची सर्व कॉलेजेस प्रोफेसर होण्याच्या करिअरच्या दृष्टीने सुपीक जमिनीसारखी आहेत. तिथे जूनमध्ये खूप सारे प्राध्यापक सुट्टीवर जातात. त्यांच्या जागी हंगामी प्राध्यापक निवडले जातात. चार महिन्यांसाठी घेतलेल्या प्रोफेसरांना इथे ‘ॲडव्हॉक’ म्हणतात. तिथे एकदा तुम्ही ॲडव्हॉक प्रोफेसर झालात की लवकरच परमनंट होता अशी मान्यता आहे. मौलाना आझाद दिल्ली कॉलेजमध्ये डॉ. लक्ष्मण यादव २०१० मध्ये चार महिन्यांसाठी ॲडव्हॉक प्रोफेसर म्हणून रुजू होतात. हा चार महिन्यांचा खेळ किती खतरनाक होणार आहे? याची त्यांना जाणीव नसते. त्या काळात ते जे.आर.एफ. ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी सुद्धा पात्र ठरले. अंगणवाडीत काम करणारी त्यांची आई त्यांच्या शिक्षणाबद्दल नोकरीबद्दल खूप आशावादी होती. ॲडव्हॉक म्हणून रुजू झाल्यानंतर ते त्याबद्दल ते म्हणतात की, ‘माझा आजचा दिवस म्हणजे जसं काही भूमिहीन कामगाराला जमिनीचा तुकडा मिळावा असा होता.’ कारण त्यांच्यासारख्या अगणित तरुणांना सध्याच्या व्यवस्थेतील अगणित परीक्षा ठेचून घरी परतायला लावतात. त्यांच्याबरोबरचे राकेश, संगीता, मनोज, अभिनव, रेणू आणि फुलबदन त्यांचे बॅचमेट घरी परतून मजुरी, रोजंदारी करत असताना लेखक दिल्ली विद्यापीठात एका कॉलेजमध्ये शिकवतो याचे त्याला हायसे वाटते.
ह्या पुस्तकाच्या लेखनामागील भूमिका मांडताना डॉ.लक्ष्मण यादव लिहितात की, “लेखणी आणि पुस्तक ही माणसाची दुष्प्राप्य कामगिरी आहे. कष्टकरी हाताने जगाला आकार दिला तर लेखणी असलेल्या हाताने त्यात रंग भरले. आज आपण ज्याला भारत म्हणतो ती बहुरंगी संस्कृती शेतकरी, कामगार, शिल्पकार आणि बुद्धिजीवी यांनी हजारो वर्षांमध्ये रचली आहे. बुद्धिजीवी हे शेतकरी, कामगार, वर्गातून येतात आणि शेवटी त्यांच्यासाठीच बोलतात. ‘विश्वगुरू’च्या प्रतिमेतील जे काही रंग आहेत तेही आम्हीच भरलेले आहेत. या विश्वगुरू भारताच्या प्रतिमेत गुरूंची खरी स्थिती काय आहे? आणि या गुरूंमध्ये शेतकरी, कामगार, शिल्पकार आणि दलित वंचित घटकांची भागीदारी किती आहे? आपल्या शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांचे दरवाजे आपण सर्वांसाठी उघडू शकतो आहोत का? लेखणी आणि पुस्तक प्रत्येक हातात पोहोचवलं आहे का? आपल्या देशातल्या शिक्षण संस्था आजही अभिमान वाटण्यासारख्या राहिल्या आहेत का? या प्रश्नांवर प्रामाणिकपणे चर्चा करणे हे विश्वगुरू होण्याच्या शक्यतेला खरोखर न्याय देणे आहे. दृष्टेपणाच्या प्रामाणिकपणासाठी सत्ता दाखवते तितकेच वास्तव न पाहणे आवश्यक आहे. दडपलं जात असलेलं वास्तव माहीत असणं ही जागरूक नागरिक असण्याची अट आहे. इतिहास बहुतांशी सत्तेच्या बाजूने लिहिला जातो. तो खरंतर परिपूर्ण नसतो. इतिहास लेखनात किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष केले जातं पण इतिहासातील बहिष्कृत भाग आपल्या न सांगितलेल्या भागासह येऊन आढळतो अशी एक वेळ येते.”
नायजेरीयन लेखक समीक्षक चिनुवा अचेबे यांच्या शब्दात सांगायचं तर, “जोपर्यंत हरीण आपला इतिहास लिहिणार नाही तोपर्यंत हरणांच्या इतिहासात शिकाऱ्याच्या शौर्याचे किस्सेच सांगितले जात राहतील.” ‘प्रोफेसरची डायरी’ मध्ये विद्यापीठ ते शाळा यांमध्ये काम करणाऱ्या असंख्य हंगामी शिक्षकांना रोज सहन करावे लागणारे अनुभव आहेत. या हंगामी शिक्षकांना ॲडव्हॉक प्रोफेसर, गेस्ट टीचर, शिक्षण मित्र, कंत्राटी शिक्षक अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. हे पुस्तक म्हणजे या वेगवेगळ्या नावांची प्रातिनिधिक गोष्ट आहे. त्यांचे काम एकच आहे ‘शिकणं आणि शिकवणं! हा असा व्यवसाय आहे जिथे शिक्षक सोडून सारे काही ‘परमनंट’ आहे. अभ्यासक्रम, विद्यार्थी, लिहिणे वाचन, नोट्स, खडू-डस्टर, मार्कर, बिल्डिंग, परीक्षा कार्यक्रम, कर्तव्ये असं सारं काही परमनंट मात्र त्यांच्या मुळाशी उभा असलेला ‘शिक्षक’ मात्र ‘परमनंट नाही’. आज व्हेंटिलेटरवर असलेल्या आपल्या देशाच्या शिक्षणव्यवस्थेला हंगामी शिक्षकांच्या माध्यमातून ऑक्सिजन दिला जात आहे.
डॉ. लक्ष्मण यादव आपल्या संघर्षाची कथा अगदी नैसर्गिक भावाने महत्वाच्या तारखेनुसार सांगतात. देशाच्या राजधानीतील एका प्रतिष्ठित केंद्रीय विद्यापीठात जवळपास चौदा वर्षे हंगामी सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. गर्दी होऊन जाणं त्यांच्या काळाची नियती झाली आहे. परंतु त्या गर्दीचा भाग होण्यास नकार देत हे पुस्तक डॉ. लक्ष्मण यादव यांनी वाचकांच्या हातात दिले आहे. त्यांना ही कल्पना आहे की, यानंतर त्यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढतील पण त्यांना ती जोखीम घ्यायची आहे. कारण त्यांचा संबंध आताच्या या पिढीच्या भविष्याशी आहे. बहुसंख्यांक दलित, मागास, आदिवासी आणि वंचित शोषित घटकातील मुलं पहिल्यांदा उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात तेव्हा त्यांना नियोजनबद्ध पद्धतीने उध्वस्त केले जाते. लेखणी आणि पुस्तक यांनी एक सोनेरी भविष्य घडतं, ही उपेक्षित मुलं चांगलं शिक्षण घेतील तेव्हा चांगलं आयुष्य भविष्य स्वतःला व कुटुंबाला देऊ शकतील. शाळा. महाविद्यालये, विद्यापीठे येथे जाऊन हे समजून घेतील तेव्हाच प्रश्न विचारतील, तरच लढतील. त्यामुळेच विद्यापीठाची उंची कमी केली जात आहे जेणेकरून धर्मसत्ता कायम टिकून राहील. विद्यापीठे जर्जर होतील तेव्हाच तरुणांना भावनिक वा धार्मिक संभ्रमात गुंतवून ठेवण्याचे षडयंत्र यशस्वी होईल. नवी विद्यापीठे सुरू करणे काळाची काळजी असायला हवी परंतु मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून नवीन प्रार्थनास्थळे बांधली जात आहेत. शिक्षणावरील आर्थिक बजेट कमी कमी होत आहे.
देशातील बहुतांश शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची निम्म्यापेक्षा जास्त पदं रिक्त आहेत. त्यातही राखीव कोट्यातील ९० टक्केपेक्षा जास्त पदांवर परमनंट नियुक्ती झालेल्या नाहीत. तुम्ही तुमच्या गावखेड्याच्या आजूबाजूला सरकारी शाळांची दुरावस्था पाहात असालच, विद्यापीठ आणि पदवी महाविद्यालयांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. मोजकी केंद्रीय विद्यापीठे आणि काही पदवी महाविद्यालये वगळल्यास भारतातील शिक्षणसंस्था आपल्या सर्वात वाईट काळातून जात आहे असे चित्र आहे. इमारती नाहीत, शिक्षक नाहीत केवळ सारं कागदावर आहे असेही अनेक ठिकाणी घडत आहे. कागदावरील इमारती, शिक्षक, शिक्षण आणि वाटल्या जाणाऱ्या पदव्या. शिक्षणाचे क्षेत्र कुटुंब, शाळा, महाविद्यालये ते विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे. शिक्षणक्षेत्राची परिपूर्ण परिस्थिती मांडत असल्याचा दावा ‘प्रोफेसरची डायरी’ हे पुस्तक करत नाही. लेखकाच्या वाट्याला जितकी आली तितकीच वस्तुस्थिती यात आहे. प्रत्येक हंगामी शिक्षकाची गोष्ट अगदी अशीच असेल असं नाही. एखाद्या महिला शिक्षकाची गोष्ट यापेक्षा जास्त त्रासदायक असेल, एखाद्या वंचित-शोषित पहिल्या पिढीतील हंगामी शिक्षकाची स्थिती यापेक्षा जास्त भयानक असू शकेल. देशाची राजधानी दिल्लीमध्ये अनेक अडचणींमध्ये हे पुस्तक लेखकाने लिहिले आहे.
सध्याच्या काळात बोलण्याची किंमत मोजावी लागते, प्रश्न निर्माण करणाऱ्या जागाच कमजोर कराव्यात असे प्रश्नांना घाबरणाऱ्या सत्तांना वाटतं त्यामुळे शिक्षक घाबरून राहिला पाहिजे असा सत्तांचा प्रयत्न आहे. ‘घाबरलेला शिक्षक त्याच्या वर्गात कणाहीन विद्यार्थी घडवतो आणि त्याचे समाजात गेल्यावर मुर्दाड नागरिकात रूपांतर होतं.’ असे म्हणत लेखक संत कबीरांचा पुढील दोहा उद्रृत करतात,
‘साधो देखो जग बौरानाI
सांची कहौ तो मारन धावै झुठे जग पतियानाII’tive Heading

सदर परिक्षण विषयी आपल्या प्रतिक्रीया कॉमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा
डॉ.प्रतिभा जाधव

( साहित्यिक, वक्ता, एकपात्री कलाकार, यू-ट्यूबर )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *