आय ए एस अधिकारी श्री आशिष येरेकर बोलत होते. मी ऐकत होतो. माझ्याबरोबरच माझे सर्व विद्यार्थी करिअर कट्टा या उपक्रमात सहभागी झाले होते. त्या दिवसचे वक्ते होते श्री आशिष येरेकर. तेव्हा ते गडचिरोली जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी व आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची एक एक गोष्ट
जितने वाले कोई अलग काम नही करते वे हर काम अलग ढंग से करते है
या समीकरणात बसत होती. खऱ्या अर्थाने गंगा आली रे अंगणी या कवितेच्या ओळी प्रत्यक्ष उतरण्यासाठी राबणारे श्री आशिष येरेकर हे आय ए एस अधिकारी वाटले.
गडचिरोलीला बदली झाली म्हणजे अनेक अधिकाऱ्यांना ती शिक्षा वाटते. पण काही अधिकारी असे आहेत इथे या शिक्षेचे सोन्यात रूपांतर करतात. अशाच आय ए एस ऑफिसरमध्ये आशिष येरेकरांचा समावेश करावा लागेल. गडचिरोली जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी व आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी गडचिरोलीमध्ये जे काम केले ते निश्चितच इतिहासात नोंद करण्यासारखे आहे. त्यांनी अनेक कल्पक योजना राबवून गडचिरोलीचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. याला कारण ते ज्या परिस्थितीतून आले त्याची जाणीव त्यांना सुरुवातीपासूनच आहे असेच म्हणावे लागेल.
खरं म्हणजे श्री आशिष येरेकर हे मुंबईमधून आयआयटी पदवीधर झालेले तरुण. चांगली नोकरी सहज मिळाली असती. लठ्ठपगारही मिळाला असता.
पण
घार हिंडते आकाशी
लक्ष तिचे पिलापाशी
या नात्याने त्यांनी युपीएससीचा मार्ग स्वीकारला. सुरुवातीला नोकरी करून आपण आय ए एस ची तयारी करू या असे त्यांनी ठरविले.
मुंबईला चांगला जॉब पण मिळाला. पण एक-दीड महिन्यातच त्यांच्या लक्षात आले की आपला जॉब आणि यु पी एस सी ची तयारी हे समीकरण जुळणारे नाही. आणि म्हणून ते म्हणाले असा जॉब निवडा की तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी झाली पाहिजे. त्यांनी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा कोचिंग क्लास वर भर न देता व त्यामध्ये आपला पैसा व वेळ न गमावता स्वयं अध्ययनावर लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा फंडा त्यांना आय ए एस पर्यंत घेऊन गेला. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या बार्टीची मदत होतीच .त्यातही नागपूर येथील शासकीय प्री आय ए एस कोचिंग सेंटर त्यांच्या मदतीला आलं. महाराष्ट्रात नागपूर अमरावती नाशिक मुंबई पुणे औरंगाबाद व कोल्हापूर येथे शासकीय आयएएस प्रशिक्षण केंद्रे आहेत. तिथे राहण्याची जेवणाची तसेच विद्यावेतन मिळण्याची सोय शासनाने केलेली आहे .त्याचा फायदा त्यांनी घेतला. आणि ते सतत पुढे पुढे चालत राहिले. अपयश येत गेले. पण त्यावर ते मात करीत गेले.
मुलांनी काळजीपूर्वक वेळापत्रक तयार करून त्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे व खऱ्या अर्थाने स्वयं अध्ययन केले पाहिजे तर त्यांना यश मिळू शकते. अशा त्यांचा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना विश्वासात घेतलं पाहिजे. आयएएस परीक्षेमध्ये अपयश आले तरी आपण आय ए एस ची जी तयारी करतो त्यामुळे आपल्याला इतर क्षेत्रांमध्ये गेलो तरी चांगली भरारी घेता येते .असे त्यांचे मत आहे .
त्यांनी गडचिरोलीला एस डी ओ असताना केलेले प्रयोग सोशल मीडियाने उचलून धरले. आमच्या करिअर कट्टा या कार्यक्रमात ते आपले अंतरंग उघडून दाखवित होते. एक एक मुद्दा सांगत होते.आणि तो एक एक मुद्दा लाख मोलाचा होता.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वात प्रथम तर त्यांनी शालेय अभ्यासक्रम आदिवासींच्या भाषेत तयार करण्याचा संकल्प केला .आपली मराठी आदिवासींना समजेलच असं नाही आणि मातृभाषेतून शिक्षण घेतलं ते ते खरे शिक्षण आहे असं जागतिक शिक्षण तज्ञांचे मत आहे. हे सूत्र त्यांना गवसले. गोंडी आणि माडिया भाषेमध्ये त्यांनी शालेय अभ्यासक्रम तयार केले. आदिवासी मुलांना व शिक्षकांना हा सनदी अधिकारी आपला वाटू लागला .आपल्या भाषेत शिक्षण सुरू झाले. त्याचा चांगला निकाल मिळाला .गोंडी आणि माडिया ही आदिवासींची गडचिरोली जिल्ह्यातील भाषा. त्या भाषेमध्ये अभ्यासक्रम तयार करणे म्हणजे कठीणच काम. पण
कौन कहता है कि आसमान मे सुराग नही होता
एक तो पत्थर तबीयत से उछालो यारो
गडचिरोली मधील मुले डॉक्टर झाली पाहिजेत इंजिनिअर झाली पाहिजेत असे सर्वांनाच वाटते .सरकार पण त्या दृष्टिकोनातून पावले उचलत
आहे. अशावेळी हा अधिकारी पुढे आला. ते मूळचे नांदेडचे .लातूर पॅटर्न आणि नांदेड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात गाजत होते व आहेत. खऱ्या अर्थाने गंगा आली रे अंगणी या ओळी त्यांनी सिद्ध करून दाखविल्या. नांदेडच्या आय बी बी आणि लातूरच्या आरसीसी या संस्थांची त्यांनी संपर्क साधला. तिथले तज्ञ गडचिरोलीच्या जे डबल इ व नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना या परीक्षांचे प्रशिक्षण देऊ लागले .आदिवासी मुलांबरोबर पोलिसांचे मुलांना त्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी करून घेतले. त्यांची ही दृष्टी गडचिरोलीच्या आदिवासी व पोलिसांच्या मुलांना नवा मार्ग दाखवून गेली .
आदिवासी लोकांमध्ये कौशल्य आहे पण ते कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच नोंदणीय आहे .गडचिरोली जिल्हा हा जंगलाचा. त्या जंगलाचा खऱ्या अर्थाने त्यांनी फायदा घेतला .त्यांनी तिथल्या आदिवासी बांधवांना कास्ट कला शिकविली. कास्ट कला म्हणजे लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे. सुरुवात त्यांनी भारतीय संविधानापासून केली. लाकडामध्ये भारतीय संविधानाची प्रस्तावना कोरल्या गेली. आदिवासी कास्ट शिल्प करायला लागले करायला शिकले आणि आदिवासींच्या हाताला काम मिळाले.
पॅडमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले जागतिक कीर्तीचे तामिळनाडूचे मुरुगनाटन यांची त्यांनी मदत घेतली व गडचिरोली जिल्ह्यात सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा प्रकल्प त्यांनी प्रारंभ केला. तिथल्या माणसांना तिथल्या महिलांना त्यांनी उद्योगी बनवले. शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र क्रांती करण्यासाठी सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ श्री हेरंब कुलकर्णी यांची मदत घेतली. आपला कार्यकाळ त्यांनी गाजवून टाकला. येणाऱ्या अधिकाऱ्याने फक्त आम्ही पुढे चालू हा वारसा या प्रमाणे वागले तर गडचिरोली सुजलमसफलम झाल्याशिवाय राहणार नाही .
पुढे आशीष येरेकरांची अहमदनगर म्हणजे आताचे अहिल्यानगर येथे बदली झाली. मी त्यांना तिथे भेटायला गेलो .अशा चांगल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यांच्या चांगल्या कृतींचे समर्थन केले पाहिजे. हा आमचा विचार. त्या न्यायाने मी गडचिरोली जिल्ह्यात 137 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या .कुठल्याही प्रकारचे मानधन न घेता प्रवास खर्च न घेता आम्ही गडचिरोली जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला ..
रहे ना रहे हम महेका करेंगे
या न्यायाने आम्ही काम करीत होतो आहे आणि राहूपण. अशा या आमच्या प्रकल्पात सनदी अधिकारी सर्वश्री राहहूल रेखावर श्री उदय चौधरी श्री आशिष येरेकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळाले तर खूप काही चांगले होऊ शकते .
साथी हात बढाना
एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना
या प्रमाणे काम करण्याची गरज आहे .
ंश्री आशिष येरेकर यांचे हे काम प्रसारमाध्यमांनी उचलून धरले .त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा जो कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याची निश्चितच नोंद झाली आहे .आज असे क्रियाशील कर्तव्यदक्ष नवीन उपक्रम राबविणारे श्री आशिष येरेकर अमरावती जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून लाभले आहेत .खरं म्हणजे एस डी ओ असताना ते जर एवढे मोठे काम करू शकतात. तर जिल्हाधिकारी झाल्यावर तर ते खूप खूप काम करू शकतात.जिल्हाधिकारी म्हणून ही त्यांची पहिलीच पोस्टिंग आहे .पण मला खात्री आहे की हे दृष्टी असलेले श्री आशिष येरेकर हे अमरावती जिल्ह्यासाठी खूप काही करतील आणि इतरही जिल्हे त्यांचे अनुकरण करतील असे निश्चितपणे वाटते. यासारखे अधिकारी जर महाराष्ट्राला आणि देशाला लाभले तर देशाचे पाऊल पडते पुढे असेच म्हणावे लागेल. आशिष येरेकरांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे. आता वेळ आपली आहे. जिल्ह्याचा विकास करायचा आहे. पर्यायाने महाराष्ट्राचा आणि पर्यायाने भारताचा विकास करायचा आहे. त्यासाठी एकत्र येऊ या आणि आशिष येरेकरांच्या चांगल्या उपक्रमाच्या पाठीशी आपण उभे राहूया. एवढेच.
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003