Hurry Up Now The Deal is Here!

Dr. Mareshchandra Katholeप्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे

विद्वानांकडे विद्या व्यासंगअसतो, तर कधी- कधी लोकसंग्रह नसतो. नेते मंडळीकडे लोकसंग्रह असतो‌, तर काही ठिकाणी विद्वता कमी असते. परंतु ह्या दोन्हीचा मेळ आपल्या ठायी असणार्‍या काही मोजक्या दुर्मिळ प्रभृती असतात. अमरावती शहरातील असे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे आहेत.ते आता 70 वर्षाचे आहेत. तरुणांना लाजविणार्‍या उत्साहाने व ऊर्जेने ते सेवानिवृत्ती पूर्वी व नंतरही मिशन आय एस एस च्या माध्यमातून 22 वर्षापासून युवकांना प्रेरणा देण्याच्या कामाने झपाटलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात त्यांच्या’ मी आयएएस होणार’ चे पंधरा हजार कार्यक्रम घेतले आहेत. आता तर त्यांनी अन्य राज्यातही कार्यक्रमाचा झपाटा लावलेला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांना मानधनाची अपेक्षा नसते. IASच्या तयारीसाठी मार्गदर्शन व माहिती विचारणार्‍या विद्यार्थ्यांकरीता त्यांनी ‘हेल्पलाइन सेवा’ सुरू केलेली आहे. या क्रमांकावर ते स्वतः विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी विनामूल्य माहिती उपलब्ध करून देतात.
महाराष्ट्रातील मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आयुक्त, जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,पोलीस आयुक्त व हजारो युवक-युवती, शिक्षक मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक शिक्षक संचालक पासून तो विद्यापीठाचे कुलगुरू या सर्वांशी त्यांचा संपर्क असून ते समन्वय राखून आहेत.मिशन आयएएसच्या कामातून त्यांनी यूपीएससी व एमपीएससी परीक्षांमध्ये यशस्वी, शेकडो सनदी अधिकाऱ्यांमध्ये व कामामुळे आदराचे स्थान प्राप्त केलेले आहे. त्यातील अनेक अधिकाऱ्यांना ॲकॅडेमीत आणून त्यांचे विचार व मार्गदर्शन उत्सूक विद्यार्थ्यांना करून दिले आहे. आतापर्यंत त्यांच्या डाँ. पंजाबराव देशमुख अकादमी मध्ये विविध उपक्रमात जवळपास ३५० सनदी व राजपत्रित अधिकारी येऊन गेले आहेत. त्यांचे राहते घर मिशन आय एएस चळवळीचे केंद्र झाले आहे. अनेक होतकरू महत्त्वाकांक्षी व गरजू मुलांना त्यांनी आपल्या घरात त्यांची राहण्याची व अभ्यासाची सोय केली आहे. घरीच वाचनालय व स्पर्धा परीक्षेचे संदर्भ ग्रंथालय विनामूल्य चालवलेले आहे .स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना त्यांनी सर्व प्रकारची मदत केली तसेच अडचणीतील व्यक्तींना व संस्थांना वेळोवेळी सहकार्य करून आपल्या सेवाभावी वृत्तीचा परिचय करून दिला आहे.
ते आपल्या संस्थेतर्फे आयएएस प्रशिक्षण कार्यक्रम “कित्येक शाळांमध्ये राबवत आहेत. हा प्रकल्प ज्युनियर आयएएस कॉम्पिटिशन एक्झामिनेशन या नावाने सुरू असून त्यामध्ये मुलांना फक्त एका रुपयामध्ये स्पर्धा परीक्षेचे दुसऱ्या वर्गापासून धडे देण्यात येतात .त्या मुलांना पुस्तके विनामूल्य मिळतात. त्यांची रितसर परीक्षा घेण्यात येते त्यांना गुणपत्रिका प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात येते. यासाठी त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस प्रशिक्षण संस्था सुरु केली . तिचेही कार्यही संपूर्ण भारतात चालू आहे. अमरावतीच्या भारतीय
महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता होते‌. आजही साहित्याशी व साहित्यिकांशी त्यांची जवळीक कायम आहे. सुरेश भट , मधुकर केचे इत्यादी प्रथितयश साहित्यिकापासून आजच्या पिढीतील बबन सराडकर, मिर्झा रफी बेग,विष्णूसोळंके, राज यावलीकर आदि आजच्या पिढीतील कवी यांच्या कित्येक बैठका व मुक्काम त्यांच्याकडे झालेला आहे. साहित्य संगम, बहुजन साहित्य परिषद आदिंनी सरांच्या सहभागाने, पाठबळाने एक काळ गाजविला आहे. “सुपर सिक्सटी” नावाची प्रेरणा व प्रशिक्षणाची प्रदीर्घ ऑनलाईन व्याख्यानमाला चालवीत आहेत. विविध विषयातील तज्ञांचे विचार व मार्गदर्शन युवकांपर्यंत पोहचविण्याची त्यांची धडपड आज चालू आहे.
‘ मिशन आय ए एस’ विविध लेखकांच्या सुमारे ७५ पुस्तकांचे त्यांनी काही पुस्तकांचे हिंदी इंग्रजी संस्करण काढणे सुद्धा सुरू आहे .संपादन व प्रकाशन केले आहे‌.
एवढा सगळा व्याप नॉन स्टॉप चालू ठेवणे त्यासाठी सर सकाळी पाच पासून रात्री अकरा पर्यंत सतत व्यग्र असतात. दिलेली वेळ पाळणे हा त्यांचा कटाक्ष असतो. त्यांच्या हाती मोबाईल व नजर घड्याळाकडे असते. तरीही संपर्कातील प्रत्येकाशी आस्थेने विचारपूस करण्यात व वरिष्ठांना योग्य तो सन्मान देण्यात ते चुकत नाहीत. शहरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन व त्यामध्ये मोठ- मोठ्या अतिथींना सहभागी करून यशस्वी करण्यात त्यांनी हातोटी सिद्ध केली आहे‌.
त्यांच्या अनेक राज्यातील दौऱ्यामुळे ‘मिशन आय. ए.एस.’च्या कार्याचा प्रसार दूरवर होत आहे. बिहार, तामिळनाडू, दिल्ली प्रमाणे केद्र व राज्य प्रशासनातील मराठी टक्कासुद्धा वाढला पाहिजे, ही त्यांची तळमळ आहे‌.
साहित्यिकांना,प्रशिक्षकांना व गरजू युवकांना डॉ. काठोळे म्हणजे हक्काचा आधार वाटतो. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या युवक-युवतींकडे सर्वात आधी पोहचून त्यांचे अभिनंदन किंवा सत्कार करणे यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.
त्यांच्या ह्या प्रचंड कामाच्या व्यापात व प्रवासात पत्नी सौ. विद्याताई काठोळे यांची मोलाची साथ लाभते. तसेच मुली पल्लवी व प्राची यांनीही त्यांना जमेल तेवढी मदत केलेली आहे.
स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत महाराष्ट्रात अमरावतीने आघाडीचे स्थान निर्माण केले आहे.विविध सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना अमरावती शहरात आणून त्यांच्या कार्याचा उचित गौरव त्यांनी करून दिला आहे. परम संगणकाचे जनक डाँ.श्री विजय भटकर साहेब, अंनिसचे श्याम मानव तसेच प्रशासनातील आजी-माजी उच्चपदस्थ अधिकारी, श्री जे.पी.डांगे साहेब, श्री विकास खारगे साहेब,व अन्य आय ए एस आणि श्री विश्वास नागरे पाटील व ३५० सनदी अधिकारी यांचेसह शेकडो प्रभृतींनी मिशन आयएएस व डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडेमीला भेट देऊन मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.
डॉ. नरेशचंद्र काठोळे ह्यांना खूप खूप शुभेच्छा. आयुष्यातील वयाचे ओझे वाटत नाही. उलट वाढता व्याप व त्याची फलश्रुती” पाहून त्यांना अधिक जोम येतो. त्यांच्या हातून युवक व समाजाप्रती भरपूर कार्य होत राहो.कारण त्यांना अजूनही वाटते–

मुष्कीलों को कह दो, अभी मै ठहरा नही हूॅं |
मंजीलो से कह दो, अभी मै पहूॅंचा नही हूॅं,|
कदमो को बांध ना पायेगी,ऊम्र की जंजीरे,
रास्तोंको कह दो,
मै अभी भटका
नही हूॅं| ‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *