Hurry Up Now The Deal is Here!

ज्यांच्या जीवनावर बारावी फेल हा चित्रपट निघाला आहे ते सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी श्री मनोज कुमार शर्मा यांचा माझा परिचय ते नागपूर येथे असताना झाला. ते तेव्हा नागपूरला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते

मी वर्तमानपत्रामध्ये दिवाळीच्या दरम्यान एक बातमी वाचली. त्या बातमीमध्ये असे नमूद केले होते की नागपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मनोज कुमार शर्मा यांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिठाईचे वितरण केले . एक आयपीएस अधिकारी इतके चांगले काम करू शकतो. कर्मचाऱ्यांना आपलेसे करू शकतो त्यांच्या दीक्षित सहभागी होऊन जातो स्वतःचे आयपीएस हे पद विसरून जातो मीही तुमच्यातीलच आहे असे दाखवून देतो हे पाहून मला खूप आनंद झाला मी लगेच त्यांच्याशी संपर्क साधला व त्यांचे अभिनंदन केले

प्रत्यक्ष मनोज कुमार शर्मा यांची माझी पहिली भेट नागपूरचे तत्कालीन पालकमंत्री नामदार श्री नितीन राऊत यांनी नागपूरला आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत झाली. विदर्भातील मुले बहुसंख्येने प्रशासनात जावी यासाठी पालकमंत्री नामदार श्री नितीन राऊत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी नागपूरचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मनोज कुमार शर्मा व अपर जिल्हाधिकारी श्री आस्तिक कुमार पांडेय यांना निमंत्रित करण्यात आले होते. श्री मनोज कुमार शर्माना मी पहिल्यांदा ऐकले ते याच कार्यक्रमात. त्यांनी आपला जीवन प्रवास उपस्थित स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितला. मला देखील नवलच वाटले . मी त्यांची अनुभव पहिल्यांदाच ऐकत होतो.एक इतक्या गरिबीतील मुलगा इतक्या संघर्ष करीत आयपीएस होतो हे खरोखरच एका कादंबरीचा विषय होण्यासारखे तेव्हा वाटले . आमची दुसरी प्रत्यक्ष भेट नागपूरच्या सिविल लाईन मध्ये आमदार निवासा समोर असलेल्या सुप्रसिद्ध अशा वसंतराव देशपांडे सभागृहात झाली.. दैनिक लोकमत युवा मंचच्या वतीने नागपूरच्या या सभागृहात माझा मी आयएएस अधिकारी होणारच हा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला श्री मनोज कुमार शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याशिवाय जिल्हाधिकारी श्री ई.झेड. खोब्रागडे कुलगुरू श्री सपकाळ पालकमंत्री श्री शिवाजीराव मोघे हे देखील उपस्थित होते. तेव्हा श्री मनोज कुमार शर्मा हे नागपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. हा कार्यक्रम भरगच्च झाला. किमान 500 मुलांना जागा नाही मिळाल्यामुळे परत जावे लागले .सभागृह पूर्ण भरले होते. मनोज कुमार शर्मा यांचा एक एक शब्द स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हृदयाचा वेध घेत होते.. सुमारे तासभर ते बोलले. बारावी फेल हे त्यांनी व्यक्त केलेले मनोगत जेव्हा बाजारात आले तेव्हा त्याला प्रचंड मागणी आली. अतिशय कमी वेळा मध्ये या पुस्तकाच्या हजारोंनी प्रति विकल्या गेल्या . मी राजस्थानमध्ये जोधपूरला असताना या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर मी दिलली जाण्यासाठी जयपूरला आलो .जयपूरच्या रेल्वे स्टेशनवर बारावी फेलच्या दोन प्रती विकत घेतल्या. आतला कागद मला चांगला वाटला नाही .मी लगेच मनोज कुमार शर्मा यांना फोन लावला. त्यांना पुस्तकाबद्दल सांगितले .पुस्तकाच्या गुणवत्तेबद्दल सांगितले .त्यांनी लगेच मला पुस्तकाच्या दोन-तीन पानांच्या झेरॉक्स पाठवण्यास सांगितले .त्याप्रमाणे मी त्या पाठवल्या आणि त्याचे लगेच फोन आला की सर हे माझे ओरिजिनल पुस्तक नाही .ही पायरेटेड कॉपी आहे.. हे पुस्तक अल्पावधीमध्ये इतके लोकप्रिय झाले ही बाजारामध्ये त्याची पायलेटेड कॉपी आली होती.

बारावी फेल या चित्रपटाने तर श्री मनोज कुमार शर्मा यांचा जीवनपट संपूर्ण जगात पोहोचला. एक खेड्यातील मुलगा किती संघर्षातून आयपीएस पर्यंत पोहोचू शकतो हे अतिशय समर्थपणे दिग्दर्शनाने लोकांसमोर मांडले. या चित्रपटाने अनेकांना दिशा दिली. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांना प्रेरणा मिळाली. अनेकांना फिनिक्स पक्षासारखे पुनर्जीवन मिळाले

श्री मनोज कुमार शर्मा श्री वीरेश प्रभू व श्री सुवेझ हक हे महाराष्ट्रातील आयपीएस क्षेत्रातील नामवंत सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा चांगला नावलौकिक महाराष्ट्रात आहे. मनोज कुमार शर्मा यांनी बारावी फेल हे पुस्तक लिहून स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने योग्य मार्गदर्शन केले आहे. प्रसंगी मोठ्या अधिकाऱ्यांची कुत्रे हाताळण्याचे काम करून त्यांनी कोणतेही काम करण्यामध्ये कमीपणा नसतो हे या तरुण पिढीला दाखवून दिले आहे. नाहीतर बाबा पैसे पाठवतात आणि अनेक मुले स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली ते पुणे मुंबई दिल्लीला उडवतात. मात्र मनोज कुमार शर्मा यांनी अतिशय किरकोळ कामे करून आयपीएस पर्यंत मजल मारली आहे त्यांच्या प्रामाणिक असल्याचं एक उदाहरण अजून या चित्रपटात पाहायला मिळते. तसेच पुस्तकात वाचायला मिळते. ते म्हणजे ते आयपीएस झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या बहिणीच्या लग्नाचा प्रसंग आला. तेव्हा त्यांनी दृष्टीचे संचालक यांना पन्नास हजार रुपये उसने मागितले. एक आयपीएस अधिकारी आपल्या बहिणीच्या लग्नासाठी आपल्या मार्गदर्शकांना 50 हजार रुपये उसने मागतो व काही दिवसात ते परत करण्याच्या आश्वासन देतो .यामध्ये त्यांच्या पारदर्शक पणाचे प्रतिबिंब पडलेले आहे आणि ते महत्त्वाचे आहे. बारावी फेल हा चित्रपट खूप गाजला. अनेकांचे डोळे उघडले .अनेकांना दिशा दिल्या. महाराष्ट्राच्या आयपीएस कॅडरला श्री मनोज कुमार शर्मा यांच्या रूपाने एक चांगला आयपीएस अधिकारी मिळाला हे वेगळे सांगणे लागेल. त्यांनी जे परिश्रम घेतले त्या परिश्रमाला आमचा मनापासून मानाचा मुजरा.

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *